Sunday, November 24, 2024

गोपालकृष्णा भगवद्‌गीता समजावुन दे दे

विनवणी 

गोपालकृष्णा भगवद्‌गीता समजावुन दे दे
तूच वाचवी गाउन घेई रहस्य प्रकटू दे!ध्रु.

गीता मजला गंगामाई उसळतात लाटा 
अंधारातहि आत्मप्रकाशे दिसताती वाटा 
कृष्ण कृष्ण जय धून अंतरी संतत चालू दे!१ 

आपले आपण बंदी व्हावे ठरल्या जागेत 
नयन मिटावे एकवटावे लक्ष सर्व आत 
कर्मावर अधिकार फलाशा मना न स्पर्शू दे!२ 

या देहाची आप्तांचीही जाचत आसक्ती 
विषयाची तर ओढ अनावर ना लज्जा भीती 
पशुत्व मनिचे मनोहरा तू पिटाळून दे दे!३

यत्नावाचुन सर्व राहते करणे अभ्यास 
नामातच जाऊ दे माझा शेवटचा श्वास 
राम कृष्ण हरि ॐकारासह मलाच गाऊ दे!४ 

सोऽहं सुस्वर हे मुरलीधर ऐकव श्रीकृष्णा 
घे आकर्षुन इंद्रियधेनू, श्रीहरि कर करुणा 
मी माझेचा विसर पडो हा एवढाच वर दे!५ 

न संपणारे महायुद्ध या जीवन म्हणतात 
षड्रिपु कौरव सद्‌गुण पांडव दोन्ही पक्षात 
धर्म तिथे जय हे आश्वासन धीर वाढवू दे!६

विश्वरूपदर्शना न भ्यावे हरि हरि गर्जावे 
गुणातीत मी द्वंद्वातीतहि असे कळो यावे 
श्रीरामाला मुक्तपणाने गीता गाऊ दे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९९८

No comments:

Post a Comment