Monday, December 8, 2025

देवासी स्मरावे दुःख विस्मरावे!

देवासी स्मरावे दुःख विस्मरावे!ध्रु.

द्वैत देहभाव
घालितसे घाव
भक्तिचे कवच अंगि चढवावे!१

नाम चिंतामणि 
करांत धरूनी 
राघवाचे ध्यान करावे, करावे!२

गुंतता नामांत 
स्थिर होय चित्त
निज देहालागी पूर्ण विस्मरावे!३
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३४३ (८ डिसेंबर) वर आधारित काव्य.

ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा- दुःखाचा विसर पडतो.  देहाला सांभाळणे जरूर आहे, पण भगवंतप्राप्तीकरिता ते करावे, विषयाकरता नाही करू. बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही. "मी माझे" यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो, परंतु शेवटपर्यंत ' मी कोण ' याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली वाट ' मी देही ' असे म्हणू लागलो इथे चुकली; असत्याला सत्य मानले ही आपली चूक झाली. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्यांच्या खेळात एकाने टिपरी दिली की, तो लगेच पुढच्या गड्यापाशी जातो, त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी, जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित. परंतु त्यामध्ये भगवंताने मोठी सोय ठेवली आहे; ती ही की, जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जेवढ्या उत्कटतेने आपण नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ; मग देहाची आठवण कशाला राहील?

No comments:

Post a Comment