डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!ध्रु.
अंतरी भावाची वाण
जवळि ना थोडी ही जाण
विषयकर्दमी लोळला त्या गंगाजलही पिववेना!१
अहंता सोडि नच ज्याते
तयाची झिंग चढत जाते
सुटेना ज्यास आसक्ती तयांसी तोल गवसेना!२
असत् जे तेच उरि धरिले
भ्रमाने सत् ही लाथाडिले
फेकिले दूर जर परिसा, लोहता खचित संपेना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२० (२९ एप्रिल) वर आधारित काव्य.
कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण "स्व" देणार नाही, "स्व" देऊन "सर्व" ठेवले तरी चालेल पण "सर्व" घेऊन "स्व" ठेवला तर मात्र ते चालणार नाही. म्हणजेच "मी देतो" ही भावना राहिली, तर सर्वच देणे वाया जाते. संतांचा संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे? जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले व त्यालाच खरे समाधान मिळाले.
No comments:
Post a Comment