प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.
स्वामी माझ्या मस्तकि राहो सदा वरद हात
मनास वळवा माझ्या नकळत तुम्ही आत आत
मन पवनाशी 'नाथा' आपण अलगद जोडावे!१
इंद्रिये न ती मुळीच वैरी बालमंडळी ती
सत्संगाने श्रवणाने ती अंकित जणु होती
मना सज्जना सन्मार्गावर आपण आणावे!२
ओवी ओवी वाचत जाता कानी ये वाणी
प्रवचन स्फुरते आतुन नकळत जरि मी अज्ञानी
अनुग्रहाने मना माझिया आपण बदलावे!३
नित्य नवा दिन गुरुभेटीचा नवाच आनंद
सांजसकाळी मनास रमवी माझा गोविंद
'राम कृष्ण हरि' नामामृत मी सदैव सेवावे!४
पाठीवरुनी हात फिरावा प्रेमे निरखावे
बोलला न जरि संवादाचे सुख मी भोगावे
स्वरूप आनंदाचे दर्शन नित मज घडवावे!५
'अनुसंधानी संतत ठेवा' दुजे नको काही
मनास माझ्या अभ्यासाचा ध्यास जडुन राही
गावे भावे मी डोलावे - शांत स्वस्थ व्हावे!६
असो कुठेही असो कसाही स्वामी हृदयात
तेच आतुनी पुढची पुढची दाखवती वाट
साधनेतल्या आनंदाच्या गावाला जावे!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९८९
No comments:
Post a Comment