साधने न साधते जे, सत्संगे साधते!ध्रु.
संत राहतात देही
परी ते विदेही
अहर्निश चित्तावरी राज्य त्यांचे चालते!१
संतवचन परिसावे
तसे तसे आचरावे
विषय याचना त्यांपाशी जराही न साजते!२
'राम कर्ता' मानतात
भूती देव पाहतात
संत्संगी साधकासी आत्मज्ञान होते!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०२ (११ एप्रिल) वर आधारित काव्य.
संतांनी जगातील राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. संतांचे वचन पूर्णपणे समजून ऐकत जावे. आपल्या आणि संतांच्या कर्मामध्ये फरक आहे. ' राम कर्ता ' या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण आपलेपणाने ते करतो, म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते. जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. साधनांनी जे साधत नाही ते संतांचे सहवासात राहिल्याने साधते. आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही, इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयांमध्ये मग्न राहिले असता त्याच्या हृदयाला पीळ पडतो. आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.
No comments:
Post a Comment