Sunday, April 26, 2026

संते महत्कार्य केले भगवंता सगुणी आणिले!

संते महत्कार्य केले
भगवंता सगुणी आणिले!ध्रु.

प्रेम आले साधनी 
राम भरला लोचनी 
जणु पुण्य फळा आले!१

"राम कर्ता" बोधिले 
"राम दाता" वर्णिले 
भिन्नत्वचि विलया नेले!२

रुचि आली सेवेसी
वसला देव हृदयदेशी
सद्गुरु प्रसाद अनुभविले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११७ (२६ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, ही दृश्य मूर्ती तुझी आहे, "तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे" ही जाणीव व  कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे "भगवंत दाता आहे" ही जाणीव उत्पन्न होईल. "भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे," ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. जगाचे खरे स्वरूप कळण्यास सगुण उपासनाच कारणीभूत आहे. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते.

No comments:

Post a Comment