Sunday, January 22, 2023

कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत ध्यान साधु दे एकांती कृष्ण स्वये मजशि बोलु दे!

कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत ध्यान साधु दे 
एकांती कृष्ण स्वये मजशि बोलु दे!ध्रु.

मोह मना देहाचा, धसका या मरणाचा
नच विचार आत्म्याचा, तत्त्वाचा, सत्याचा 
स्फूर्ति मला झुंजाया कृष्ण देउ दे!१

ऐकावे, वाचावे, विवरावे, मुरवावे
मुरलेले ये कृतीत ऐसे नित वाटावे
कळले जे वळले ते शांति लाभु दे!२

भाव हवा, ध्यास हवा, चिंतनि आनंद नवा 
राम हवा, श्याम हवा योगेश्वर कृष्ण हवा 
मी जगेन गीता हे वेड लागु दे!३ 

जो विनम्र तो सुजाण, जो सुजाण भक्त जाण 
भक्ताला जीवनात पडते का काही वाण 
न्यून करित हरिच पूर्ण खोल बाणु दे!४
 
नयन मिटुन आत पहा आत पहा स्वस्थ रहा 
स्वस्थ रहा येत गृहा शांतिदूत श्यामच हा 
कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत कृष्ण बनू दे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०५.१९९८

No comments:

Post a Comment