Sunday, January 22, 2023

भगवंताची किमया कैसी चोची आधी चारा

भगवंताची किमया कैसी 
चोची आधी चारा 
कष्ट करित जा लाभे अंती 
अन्न नि वस्त्र निवारा! १

हवे हवे हव्यास नसो 
मी माझे हा स्वार्थ नसो 
घेतलेस तू जन्मापासुन 
दे तर थोडे इतरां! २

चिंतेचा का भार शिरी 
भय का बैसे तुझ्या उरी 
देवावर विश्वास ठेव रे 
तो सगळे करणारा! ३

साधा कपडा नेसावा रे 
बरी झोपडी रहावया रे 
गरजा अपुल्या थोड्या करता 
सुख शांती ये दारा! ४

सन्मार्गाचा पैसा लक्ष्मी
सत्पक्षाला वश हो लक्ष्मी 
मृगजळ भुलवी सावध राही 
वंदन करि दातारा! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०१.१९८९

No comments:

Post a Comment