आनंदाश्रू झरती गाली, मातु:श्रींची तुळा जाहली! ध्रु.
शिवमंदिर हे सजले धजले
नवल बघाया लोकहि जमले
मंगलपूजन येथ चालले
तुलादानविधि मंत्रहि घुमले अशा पर्वकाली! १
महाराष्ट्राच्या कैलासावर
मातृभक्त शिव सेवातत्पर
सृष्टीमधुनी हसला ईश्वर
धन्य पुत्र हा धन्य माउली सारी जनता स्तिमित जाहली! २
पुत्राच्या या अंत:करणी
मातृरत्न शोभले कोंदणी
पुन्हा पुन्हा ये मन गहिवरुनी
शब्द आईचा पृथ्विमोल हा अमाप माया आईवरली! ३
मांगल्याचे निधान येथे
औदार्याचा निवास येथे
पावित्र्याचा परिमल येथे
मातृपूजना शिवरायाची भावफुले ही उमलुन आली! ४
मातेच्या हृदि सुपुत्र कौतुक
मातृपूजना शिवबा उत्सुक
तात पाहती वरुनी कौतुक
सोन्याचे पारडे टेकले – मातु:श्रींची तुळा जाहली! ५
त्याग कराया जो नर धजला
संयम शिकला, अनन्य झाला
खडतर निश्चय साथी गमला
ग्रहणकाल हा जणू पर्वणी पारख करण्या असे पातली! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment