Monday, January 23, 2023

अकस्मात होणार होऊन गेले!


काळानळाची चाहूल नव्हती
हुरहूर कसली नव्हतीच चित्ती
कृतांते सतीचे सौभाग्य लुटले 
अकस्मात होणार होऊन गेले!१

शिकारीस राजे मोदे निघाले
दैवेच त्यांना भुलवून नेले
अश्वामुळे संकट ओढवीले
अकस्मात होणार होऊन गेले!२

कर्नाटकप्रांति हे सर्व झाले
कृतांतापुढे ना कुणाचेच चाले
पित्याने शिवाच्या जगा सोडियेले
अकस्मात होणार होऊन गेले!३

जी ठेच अश्वा, ती ठेच भाग्या
जी ठेच ताता, ती ठेच पुत्रा
अखेरीस मृत्यू - तिथे सर्व हरले
अकस्मात होणार होऊन गेले!४

अता कौतुकाते पिता येथ नाही
विसाव्यास आधार खंबीर नाही
कळे ना मना दैव का व्यर्थ रुसले?
अकस्मात होणार होऊन गेले!५

पुढे काय आहे कुणा कल्पना ना
मनी रंगवी मर्त्य ते बेत नाना
परी कालवाते असे लोळवीले
अकस्मात होणार होऊन गेले!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment