राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि मन वेडे गाते
श्रीकृष्णाच्या गीतेमधुनी हरिजीवन कळते !ध्रु.
श्रीकृष्णाच्या गीतेमधुनी हरिजीवन कळते !ध्रु.
मना माझिया तुजला लागो नामाचा छंद
नको धावण्या इकडे तिकडे आतच गोविंद
अंधारातुन प्रकाश उमले अनुभूती मिळते !१
मुक्त कराया बद्ध जनांना जन्म तुरुंगात
भगवंताला जन्म देउनी धन्य मायतात
अघटित घडवुन अलिप्त आपण थक्कित मन होते !२
कृष्ण कृष्ण म्हण जाता येता कळण्याला गीता
कर्मफलाची सुटेल आशा मग कुठला गुंता?
नव्हे देह मी, मन वा बुद्धि नकळत हे कळते !३
जन्म जाहला लगेच तुटले बंधन मायेचे
वसुदेवाने दूर सारले निधान सौख्याचे
गोकुळात मग माय यशोदा हरिला पाजवते!४
मोह न शिवला कधी मुकुंदा, मनमोहन ऐसा
हा योगेश्वर पूर्ण विरागी पुरुषोत्तम ऐसा
शब्दांमागुन सुचवत शब्दा कोण लिहुन घेते?५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०५.१९९१
No comments:
Post a Comment