Thursday, October 31, 2024

सावध, सावध होई!

जय जय रघुवीर समर्थ

जे दिसते ते नाश पावते, 
टिके न जगती काही 
सावध, सावध होई!ध्रु.

आकाराला जे जे येते 
काळमुखी ते भक्ष्यच ठरते
भ्रमी न कसल्या राही?१

वेदश्रुति ही ऐसे बोलत 
निर्गुण ब्रह्मचि असते शाश्वत 
ते तू शोधुनि पाही!२ 

"तत् त्वम असि" हा बोध आगळा
जाणुनि हो रे जगावेगळा 
निर्लेपत्वा घेई!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.१९७५

खालील श्लोकावर आधारित काव्य.

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारले काळ मोडी॥
पुढे सर्व जाईल काही न राहे। 
मना संत आनंत शोधूनि पाहे॥

जे डोळ्यांना दिसते ते कोटिकल्प-शाश्वत टिकणारे नाही. जेवढे म्हणून आकाराला येते ते सगळे काळ मोडून टाकतो. पुढे (प्रलयकाळी तर सगळ्याचा नाश होईल) म्हणून मना (ह्याहून वेगळे) संत (शाश्वत) आणि आनंत काय आहे हे शोधून पाहा.

No comments:

Post a Comment