अध्याय अठरावा – मोक्षसंन्यासयोग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
धर बाळा हातात लेखणी, लिही थोडक्यात शहाण्यावाणी
शब्द जुने, अर्थ नवा लावत जावे छंद हवा
मीच अर्जुन, मीच कृष्ण संवाद आपल्याशी व्हावा
ठरल्या वेळी ठरल्या जागी बसता भरभर सुचत जाते
जाते फिरता मनबद्धींचे पीठ बारीक भुरुभुरु पडते
कर्म सतत करीत राहा, फलत्याग करीत राहा
वाईट कर्मे टाकून द्यावी, चांगली कर्मे करीत जावी
जगाला नाही सुधारायचे, आपण आतून बदलायाचे
विवेक, विचार बंधू आपले, सल्ले देतात नेहमी चांगले
राजस तामस सोडून द्यावे, सात्त्विक ते ते करीत जावे
मी कर्ता ही भ्रांति नको, हवेच फळ मज हाव नको
कोणी शिक्षक, किसान कोणी, कोणी सैनिक व्यापारी
जो तो परि उद्योजक असतो मने रंगला हरिनामी
जे होते ते शुभच चांगले, मी श्रीहरिचा हरि माझा
भगवंताची पाळिन आज्ञा हट्ट न दुसरा कधि माझा
माथ्यावरचे ओझे उतरे, आनंद झाला पार्थाला
चापबाण करि पुनरपि धरले, उधाण आले शौर्याला
संजय सांगे हुबेहुब तो प्रसंग झाला साकार
मानावे किती श्रीव्यासांचे आभारावर आभार
विषादातुनी प्रसादाकडे वाटचाल संवादाची
निराशेतुनी फुलवी आशा किमया कैसी कृष्णाची
वाचायाला आचरणाला ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची