Saturday, October 3, 2015

विनायक आला दीना घरी - "गीत गणेशायन"

विनायक आला दीना घरी -
"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार

विनायक! तसे पाहिले तर एक मुनिपुत्र. कश्यपनंदन.  त्याच्या दिव्यत्वाची प्रचिती पदोपदी येत असल्याने कृतज्ञ करही जुळत होते.  लोक त्याची स्तुतिस्तोत्रे गाऊ लागले. असा हा विनायक भोजनाकरिता आपल्या घरी यावा असे कुणाला नाही वाटणार? शुक्ल नावाचा विद्यासंपन्न पण निर्धन माणूस. मनी भक्तिभाव मात्र उत्कट.
निमंत्रणाचा आदर करून विनायक शुक्लाघरी खरंच आला-
अगदी 'देव दीनाघरी धावला.' सर्व धान्याचे पीठ करून त्याची चपाती बनवली आणि भाताची पेज तयार करून ठेवली-नैवेद्य, विश्वदेव करून झाला.
विनायकाने आनंदाने भोजन केले-इकडे तिकडे पळणारी ती पातळ पेज खाण्यास तो भगवान दहा हातांचा झाला. धन्य तो अतिथी, आणि धन्य यजमान.

विनायक आला दीनाघरी!ध्रु.
या सदनाचे मंदिर झाले
भाग्य उजळले, भाग्य उजळले
नयनी अश्रुसरी!१

भावभुकेला श्रीभगवंत
उपकारा नच असतो अंत
प्रसन्नता ये घरी!२

पेजच पुढती जरि केलेली
चवीचवीने तये सेविली
सुकृता न या सरी!३

जीवन चरणी वाहु वाटले
अनुयायी पण हवे वाटले
सार्थक जन्म तरी!४

गौरव येथे अमुचा झाला
कसा विस्मरू सुखद सोहळा
दीपावलि ही खरी!५

No comments:

Post a Comment