"गीत गणेशायन" हे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले आणखी एक काव्य. या गाण्याचे कार्यक्रम ओंकार संगीत साधना करत असे. त्या कार्यक्रमातील ऑंडिओ एक एक या ब्लॉगवर अपलोड करत आहे.
मंगलमूर्ती सिद्धिविनायक वक्रतुण्ड देवा
कृपादृष्टीने पाहुनि भक्ता करवुनि घे सेवा ।। ध्रु।।
विघ्नेश्वर तू तुझिया नामे विघ्ने पळताती
लंबोदर तू तेहि सुचविते क्षमाशील वृत्ती
ध्यान तुझे रे भाविक भक्ता मोदाचा मेवा ।। १ ।।
प्राणांचाही प्राण तूच रे योग्यांचा योग
परब्रह्म तू राहुनि अंतरि शांतिसुखा भोग
प्रणवाचा उच्चार घुमव रे वाजव तनुपावा ।। २ ।।
पाशांकुशधर गौरीनंदन मधुर तुझे नाम
बघणे लोभस, उदात्त मानस संभाषणि साम
गानकलेचा उदार हस्ते सोपव करि ठेवा ।। ३ ।।
मूषक अंकित झाला छे छे काळ नम्र झाला
त्रिगुणातीता मोदक करिचा वितरत मोदाला
प्रत्ययकारी सहवासाचा स्वर्गही करि हेवा ।। ४ ।।
चरणयुगुल तव अकार भासे उकार उदराचा
मकार गमले मस्तक अनुभव आला ब्रह्माचा
ज्ञानेशे ॐकार शिकविला कथिले तुज देवा ।। ५ ।।
वरदहस्त दे अभय भाविका तो तर आधार
कुठल्या शब्दे वानू तुजला मन मौनाकार
शुंडेसम त्या आत मुरड रे देवांच्या देवा ।। ६ ।।
निराकार ते तुझिया रुपे झाले साकार
अनंत अच्युत या नामांना झाले आधार
श्रीरामा पदि ठेव निरंतर मंगलमय देवा ।। ७ ।।
No comments:
Post a Comment