Sunday, October 4, 2015

स्त्रीया न अबला युद्ध करू - "गीत गणेशायन"

स्त्रीया न अबला युद्ध करू -
"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार

यशासारखे यश नाही दुसरे! भारतभूमी स्वतंत्र झाली. आता देवभूमी मुक्त करायची. महत्वाकांक्षा जागी झाली. स्त्रिया काही अबला नाहीत- रणरागिणीच त्या. स्वतंत्रतेचा जयजयकार दिशादिशातून घुमला. नीती बलशाली झाली. अष्टसिद्धी नायिका म्हणून युद्धसज्ज झाल्या. पराक्रमाची शर्थ करू पण विजयश्री खेचून आणूच आणू या भावनेने स्त्रिया नव्हे विनायकाच्या पराक्रमी वीरबाला समरगीत-संग्रामगीत गाऊ लागल्या -

भारतभूमि स्वतंत्र झाली
देवभूमि ही मुक्त करू
स्त्रिया न अबला युद्ध करू! ध्रु.

विनायकासम लाभे नेता
जय स्वतंत्रता जय स्वतंत्रता
एकजुटीने कार्य करू!१

जागृत शक्ती स्फुरवी भक्ती
बलशालिनी जगि आता नीती
अन्यायाला दूर करू!२

आघाडीवर पुढे जायचे
निर्भयतेने झुंजायाचे
सर्वस्वाचा होम करू!३

आम्ही हरलो दुःख नसे ते
जिंकलोच तर श्रेय लाभते
पेच असा निर्माण करू!४

अष्टसिद्धी या साहाय्य करती
अष्टव्यूह रचलेत संप्रती
पराक्रमाची शर्थ करू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment