भूपाळी - प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
अल्बम : अण्णांची गाणी
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गायक : श्री चारुदत्त आफळे
ध्वनीमुद्रण : साउंड व्हिजन स्टुडीओ, पुणे
प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
सोऽहं घोषचि घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.
माझे माझे लोप पावु दे तुझे तुझे उगवु दे
कोण असे मी? तो मी, तो मी सहजपणे कळु दे
प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।१
दृष्टि निवळु दे तिमिर जाऊ दे आशीर्वाद हवा
अभ्यासाचा या भजनाचा छंद जडु दे जिवा
सुमने सु-मने अर्पण व्हावी कृपा करा सत्वरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।२
रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव
करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव
हरिमय होउन अम्हां जाणवो हरिमय नरनारी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।३
उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे व्हावे
सोऽहं सोऽहं म्हणता म्हणता ममत्व संपावे
सोऽहं फुंकर भरा बनू द्या या देहा बासरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।४
जवळ घेउनी शिकवा गीता ओढ अशी लागली
घास सानुले करुनी भरवा आम्हा गुरुमाउली
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जपो सदा वैखरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।५
द्वंद्व न उरले दु:ख संपले अनुभव हा यावा
तिमिर मावळे गगन उजळले जाणवु दे गारवा
चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।६
स्वागत करतो सद्गुरुराया उमलो जीवनि उषा
कृपाप्रसादे स्वामी अपुल्या शमु दे सगळी तृषा
भक्तवृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।७
प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।