Thursday, April 30, 2020

मिळालेली संधी दवडू नये!

मानवाची व संधीची नेहमी चुकामूक होते.  जन्मभर पश्चात्ताप करण्याची पाळी येते. तरुणपणी अनेक मोह जिवाला भुलवतात म्हणून साधना होत नाही. आळस व झोप हे मानवाचे मोठे शत्रू! तेच मित्र वाटतात.  मानव जन्म आला हे मोठं भाग्य. थोडं मोठं  झालं आपलं हित अनहित कळायला लागलं की सन्मार्गाला लागलं पाहिजे. आत्मज्ञानाचा आनंद  मनुष्यच घेऊ शकतो. रोज श्रवण, चिंतन, मनन घडलं पाहिजे. मन ताब्यात ठेवणं ही मुख्य शिकवण.
----------------------------------------------------

करायचे ते आता कर रे बघू उद्याला म्हणू नको
आळस निद्रा शत्रू असती व्यर्थ तनाचे लाड नको
मरण न थांबे अवचित येते वदो वैखरी हरी हरी!
भक्तिपथावर चाल पुढे तू तोल सावरी तुझा हरी!१

नरजन्माचा पुरा लाभ घे, घडी अमोलिक साधावी
खरा कोण मी जाणुनि घेई परार्थ काया झिजवावी
मना आवरुनि तना सावरी मुरलीधर तव कैवारी
भक्तिपथावर चाल पुढे तू तोल तुझा सावरी हरी!२

अनुसंधानी खंड नसावा कृष्णच कर्ता हे जाण
वस्तू वस्तू ती परमेश्वर लाभ साधनेचा मान
गुरुचरणाचा घे घे आश्रय गुरुकृपेचा हात शिरी
जी मिळते ती संधि साधं रे करी साधना शर्थ करी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.११.१९९३

Monday, April 20, 2020

'हर हर महादेव' बोला

'हर हर महादेव' बोला
शिवाच्या चिंतनात डोला!ध्रु.

शंकरा आवाहन करु या
अंतरी त्याला बसवू या
संकटे सुमनांपरि झेला!१

सोसता असंख्य आघात
वज्रता येते देहात
देहही विस्मरणी गेला!२

विरागी राजा योग्यांचा
शंकर नाथ अनाथांचा
स्मशानी स्वर्गही अवतरला!३

जन्म जर पहिला दरवाजा
मरण हा सरता दरवाजा
दरारा मृत्यूचा सरला!४

यायचे सहज निघायाचे
कशातहि ना गुंतायाचे
जिवाचा जीवपणा हरला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.६.२००१

Sunday, April 19, 2020

सद्गुरुंचा शोध..

नकोस हिंडू वणवण ऐसा सद्गुरु शोधाया
तुझ्याच हृदयी वास तयाचा श्रम होतिल वाया!ध्रु.

सद्भावाला जागविण्याला साधन ते नाम
नाम मुखाने सुखे घेत जा करताना काम
सदाचार हा परमार्थाचा सुदृढसा पाया!१

मायतात तर खोड चंदनी सातत्ये झिजले
परतीची ना जरा अपेक्षा झिजता ते हसले
त्यांचे सद्गुण तेच सद्गुरु हवेत ते घ्याया!२

आकाशाला लेप न कसला विशाल ते कैसे
या भूमीला भार न कसला सहणे ते कैसे
क्षमाशीलता, विशालता ती अंगी येऊ द्या!३

सुमने देती फळेहि देती इंधन देतात
उन्हात आपण तरी वृक्ष ते छाया देतात
उपकाराला अंत न त्याच्या शिकून घे किमया!४

अनुभव येता आपण चालत सावध वर्तावे
चुकत शिकावे, सुधरत जावे गाणेहि गावे
ओळख ऐशी पटता पटता सद्गुरु ये ठाया!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.९.१९८९

Saturday, April 18, 2020

अलख निरंजन! अलख निरंजन!

अलख निरंजन! अलख निरंजन!ध्रु.

नाथपंथ आगळा आपला
जगी वावरुन जगावेगळा
काटक काया, बळकटही मन
पाणीदारच असती लोचन!१

आदिनाथ जय आदिगुरु जय
चेला चेला पुरता निर्भय
भ्रष्टाचारावरी घसरता
भाषणात मेघांचे गर्जन!२

का कोणाचे मिंधे व्हावे
का कोणाला विकले जावे
स्वतंत्र वृत्ती वनराजाची
ब्राह्मक्षात्रतेजांचे मीलन!३

मालुकवीचे ऋण हे भारी
दीनदु:खितांचा कैवारी
बाणा न्यारा या पंथाचा
आत्मज्ञाने उजळे जीवन!४

भेदांच्या कोसळता भिंती
सगळे सज्जन समरसताती
अनुभूती ही ज्याची त्याला
लाभावर ना मुळी नियंत्रण!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.४.२००४

Thursday, April 16, 2020

अप्रमाण सगळा नाश करी....



जे प्रमाणात ते सुखकारी
अप्रमाण सगळा नाश करी!ध्रु.

जगण्यासाठी भोजन करणे
जनार्दनास्तव जीवन जगणे
तत्त्व निरंतर ध्यानि धरी!१

व्यर्थ कशाला खा खा करणे
रोगांना आमंत्रण देणे
संयम ठेवा जरा तरी!२

पोटापुरते धन मेळविणे
अधिकाचा हव्यास न धरणे
नीतीचे धन हितकारी!३

लाच न घेणे देह न विकणे
शिव्याशाप ना माथी घेणे
अतिद्रव्य ते घात करी!४

पृथ्वी तत्त्वा समजुन घेणे
कृतज्ञ मातेशीच राहणे-
उठताक्षणि तू नमन करी!५

ती न तुझी रे केवळ मत्ता
काळ ना तरी देई लत्ता
लोभच अंती माती करी!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.६.१९९१

Friday, April 10, 2020

वनवास..


नसे सजा ती, असे सुसंधी
घडे वनाचा वास!ध्रु.

जीवनविद्या शिकता येते
सृष्टीशी जवळीक साधते
आज्ञापालन मायपित्यांचे
समाधान हे खास!१

पर्णकुटी बांधावी आपण
कंदमुळांचे करणे भक्षण
शक्ति वाढते सोसायाची
सहजचि हा अभ्यास!२

साधे जीवन त्याची गोडी
आता कळते थोडी थोडी
भोगविलासहि पार विसरले
संधी वैराग्यास!३

वनात चिंतन सुंदर घडते
स्वये स्वतःशी वदता येते
दिव्यत्वाची कितिदा प्रचिती
अपूर्व हा उल्हास!४

तरुलतांचा त्याग जाणवे
महिमा त्यांचा कसा वर्णवे?
काट्यांमधुनी सुमने हसती
दुःखि सुखाचा वास!५

ध्याना बसले जैसे गिरिवर
दृष्टि खिळतसे आकाशावर
काळाची गति वाटे थांबे -
मुनिवदनावर हास!६

परिश्रमच तप ऐसे वाटे
स्वानुभवे समृद्धी येते
तिन्ही ऋतूंचे भिन्नच वैभव
वाढतसे विश्वास!७

व्रतस्थ जीवन वनवासाचे
संयमनाचे, अभ्यासाचे
व्रत हे वरले बुद्ध्या खडतर
सुखद वनाचा वास!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, April 9, 2020

श्रीधरे सीमा उल्लंघिली....

श्रीधरे सीमा उल्लंघिली!ध्रु.

सज्जनगडचे मिळे निमंत्रण
सोsहं श्रीराम चाले स्पंदन
अश्रुधार लागली!१

अनवाणी पथि पुढती जाता
समर्थ अंतर्बाह्य तत्त्वतः
समता ही साधली!२

चंदनापरि झिजविन काया
आळवीन मी सद्गुरुराया
ओढ तीव्र लागली!३

देहाची मग तमा कुणाला?
काय संकटे कृपांकिताला?
गुरुकृपा जाहली!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.१०.१९८०

तेचि सदन भाग्याचे


गृहस्थो मितभाषी च
गृहिणी तस्य शांतिदा
आज्ञाङ्कितौ कन्यापुत्रौ
प्रसन्नं गृहजीवनम्।।

अर्थ :
अत्यंत मोजके-नेमके बोलणारा गृहस्वामी, मनःशांती देणारी त्याची गृहिणी व सदैव आज्ञान्कित असणारी मुलंमुली! असले गृहजीवन सुप्रसन्नच.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०७.१९८५ रोजी तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले सुभाषित 

Wednesday, April 8, 2020

जय बजरंग बली!



आते जाते हम गाते हैं
जय बजरंग बली।ध्रु.

रामचंद्र की सेवा में
इस जीवन की शाला में
छाया शीत मिली।१

नामरतन ऐसा पाया
मैं, मेरा सब कुछ खोया
रामकथा सुन ली।२

रामचंद्र की जय बोलो
परिवर्तन तुम कर डालो
अभिनव स्फूर्ति मिली।३

दास बना वह धन्य हुआ
कृतार्थ उसका जन्म हुआ
सुंदर सीख मिली।४

बलोपासना, गुणोपासना
कलोपासना यही साधना
आज्ञा प्रभु की मिली।५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.६.२००२

भूपाळी हनुमंताची



प्रभात झाली मारुतिराया जाग जाग आता
मति प्रकाशित करी आमुची अगा रामदूता!ध्रु.

श्रीरामाचे नाम स्फुरता होऊ निष्काम
तुझिया स्मरणे प्रसन्न होई सत्वर श्रीराम
मन पवनाला दे दे जोडुन ने गगनी भक्ता!१

आत्मबलाची जोड लाभता अशक्य ते काय?
हृदय जिंकण्या दास धरतसे स्वामींचे पाय
निश्चयास जय लाभे निश्चित दे निश्चय आता!२

सुखदुःखे ही सहता यावी शिकवी बलवंता
नकोत वृत्ती मनी उठाया अमुच्या धीमंता
तुझा अनुग्रह प्रार्थित आम्ही कृपा करी आता!३

इंद्रियाधिपति मन जर झाले अमुच्या आधीन
रामांकित का कधी आढळे पृथ्वीवर दीन
श्वासोच्छ्वासी नाम स्फुरवी शुद्ध करी चित्ता!४

वीरांचा तू वीर प्रसंगी दासांचा दास
शक्ति बाणता अंगी निष्प्रभ ठरतो यमपाश
चिरंजीविता सेवाधर्मा दिलीस हनुमंता!५

आलस्यावर गदा हाणुनी करी चूर्ण चूर्ण
कर्मि कुशलता, समता चित्ता लाभो संपूर्ण
श्रीरामाला हाती धरुनी निधडा करि आता!६
(कवि श्रीरामा)

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.४.१९८१

Sunday, April 5, 2020

शुभं करोति!


देवापुढे लावा दिवा
शुभं करोति हे म्हणा।
घरधनी असो सुखी
सांगा हेच दयाघना।
आईची ही शिकवण
बालमनाला भावली।
मास गेले गेली वर्षे
सुखलिपी उमटली।
देवाजीशी नाते असे
कायमचे जुळलेले।
आहे पाठीशी सदैव
आले अनुभवा आले।
इडा पिडा टळलेली
अमंगल पळाले ते।
प्रभुच्छाया शिरावर
जाणवले जाणवते।
मंगलारती प्रसाद
सुधेहून सारे गोड।
बावरल्या मना रुचे
नाम, ज्याला नाही तोड।

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
४.९.२००४

Saturday, April 4, 2020

भाग्यवंत तुजसम तूच पुत्र ईश्वराचा -



भाग्यवंत तुजसम तूच पुत्र ईश्वराचा -
जाण जाण जीवा माझ्या 'अर्थ' जीवनाचा!ध्रु.

तुझे ईश्वराशी नाते असे जोडलेले
तयानेच विश्वासाने जगी धाडलेले
कार्य असे काही कर हो धनी कौतुकाचा!१

भार नको मानू कर्मा धर्म तोच दैवी
सज्जनास वश हो विश्व तो खरा सुदैवी
हास बोल मुक्त मनाने मंत्र हा सुखाचा!२

दर्शनास न लगे जावे सदा मंदिरात
इथे तिथे बघ भगवंता तुझ्या जीवनात
देह शुद्ध राखी तो रे निवारा हरीचा!३

आजवरी जरी चुकला तू सुधारणा होई
भाव भाविकाला नित्य पुढे पुढे नेई
तुझा वारसा प्रेमाचा नसे तो धनाचा!४

नदी वाहणारी गंगा तसा तू हि शुद्ध
नाम घेत गोपालाचे कसा असे बद्ध
मोक्षलाभ या देही तू सुखे घ्यावयाचा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.९.१९८९

Thursday, April 2, 2020

स्वर्ग हा भूवर अवतरला...

शीतल गंधित वायु सुटला, दुमदुमला चौघडा
प्राजक्ताने हसत घातला सुमनांचाही सडा
सनई गाई, मंजु स्वराने आलापित कोकिला
स्वर्ग हा भूवर अवतरला!१

दशरथहृदयी सागर उसळे, मुखचंद्रांच्या दर्शनामुळे
गहिवर आला भरले डोळे आनंदाश्रू झर झर झरले
कानी आला बालरुदनस्वर धन्य जन्म झाला
स्वर्ग हा भूवर अवतरला!२

जन आनंदित, संत उल्लसित, वृक्ष प्रफुल्लित झाले
अमृतसम मधु पय शरयुतुन कधिचे झुळझुळले
ध्वज उभारले, सजली द्वारे, उच्च स्वर लागला
स्वर्ग हा भूवर अवतरला!३

थवे स्त्रियांचे पथापथांतुन, पुष्पवृष्टी प्रासादातुन
मुग्ध कळ्या ही आल्या उमलुन, अधिक कोवळे झालेले ऊन
कस्तुरि, चंदन, कुंकुम यांचा सडा पथी घातला
स्वर्ग हा भूवर अवतरला!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.७.१९७३
सारंग आधा

स्मरू या गुणसागर श्रीराम..

श्रीराम! गुणांचा सागर
त्याचे भाषण मधुर! त्याचे वागणे उत्साह वाढविणारे! त्याचा दयाभाव आगळा! त्याचा पराक्रम शब्दांच्या पलीकडचा. अशा श्रीरामाला आपण पाहिले नाही पण भरपूर ऐकले आहे आणि त्याचे वास्तव्य आपल्या अंतःकरणात आपल्या जन्मापासूच आहे.
- तर अशा गुणसागर रामाचे स्मरण करू या.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

स्मरू या गुणसागर श्रीराम! ध्रु. 

शांत, सुशीतल ,सुमधुर भाषण
करुणावचने, अमृतसिंचन
श्रांतांचा विश्राम!१

अवघे जीवन प्रखर साधना
कण कण झिजणे गती चंदना
तप्तासी आराम!२

पतितांचा उद्धार करावा
निरर्थकाला अर्थ मिळावा
दीनोद्धारक राम!३

हा भरताचा, शत्रुघ्नाचा
सौमित्राचा, सुग्रीवाचा
सख्यभाव अभिराम!४

सुता धरेची, पुत्र नभाचा
संगम गमला अलौकिकांचा
जानकिजीवन राम!५

वनवासी जन जवळ धरावे
एकविचारे एकवटावे
कुशल संघटक राम!६

यौवराज्य वा विजनवास वा
समान दोन्ही मनी गारवा
ऐसा शांताराम!७

सत्यपथाचा राघव यात्रिक
माणुसकीचा राघव मांत्रिक
पुरुषोत्तम श्रीराम!८

शौर्य शोभते विश्वासासह
राम धनुर्धर निज अनुजांसह
विराग्रणि श्रीराम!९

देही असला तरी विदेही
तयास वरिते ती वैदेही
हा तर आत्माराम!१०

ज्याच्या त्याच्या अंतरि आहे
मना सज्जना शोधुन पाहे
दासांचा श्रीराम!११

असुनि नसावे, नसुनि असावे
कार्य करावे, दूर राहावे
कमलपत्र श्रीराम!१२

कृतीत यावा एक एक गुण
श्रीरामाचे हे तर पूजन
पूजक पूज्यहि राम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
भीमपलास

Wednesday, April 1, 2020

गाऊ तव विजयगान..



गाऊ तव विजयगान!ध्रु.

देशभक्ति व्रत घेसी
सांघिकता आपणिसी
तेजाचे तू निधान!१

कीर्तीची आस नसे
श्रद्धा कर्तव्यि असे
पौरुष परि दीप्यमान!२

चिंतन मुनिसम केले
सत्याते अनुभविले
अनुभूती तव प्रमाण!३

स्वार्थशून्य ध्येयशरण
जीवन छे संजीवन..
सेवक तू निरभिमान!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(डॉ. हेडगेवार यांच्यावर केलेलं हे काव्य)
१७.९.१९७२

केशवा ही चरणी प्रार्थना..



केशवा ही चरणी प्रार्थना
शक्ति दे संघशक्तिवर्धना!ध्रु.

तुझा कळवळा, तुझा जिव्हाळा
तुझा त्याग अन् स्नेह वत्सला
पूजक व्हावा पूज्यासमची
नाही दुसरी कामना!१

दे तव निष्ठा, दे तव साहस
दे तव आशा, विशुद्ध मानस
ध्येयवेडही तुझे मिळू दे
गती मिळू दे संघटना!२

तव गुणकीर्तन नवसंजीवन
तुझी आठवण दे प्रोत्साहन
कर्मदीप जो करी निरविला
उजळो विश्वी कणा कणा!३

ज्योत अंतरी सतत तेवु दे
मनामनांचा स्नेह जुळू दे
कार्य अखंडित हातुनि व्हावे
याच साठि दे चेतना!४

मनास लागो सतत टोचणी
शरीर होवो खोड चंदनी
क्षणहि न वाया जाऊ द्यावा
अभेद्य ठरु दे संघटना!५

समष्टीत व्यक्ती विलयावी
मी तूपण ही जाण नुरावी
अशी कृपा दे, ऐसा वर दे
अद्वैताच्या आचरणा!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले