Wednesday, April 8, 2020

भूपाळी हनुमंताची



प्रभात झाली मारुतिराया जाग जाग आता
मति प्रकाशित करी आमुची अगा रामदूता!ध्रु.

श्रीरामाचे नाम स्फुरता होऊ निष्काम
तुझिया स्मरणे प्रसन्न होई सत्वर श्रीराम
मन पवनाला दे दे जोडुन ने गगनी भक्ता!१

आत्मबलाची जोड लाभता अशक्य ते काय?
हृदय जिंकण्या दास धरतसे स्वामींचे पाय
निश्चयास जय लाभे निश्चित दे निश्चय आता!२

सुखदुःखे ही सहता यावी शिकवी बलवंता
नकोत वृत्ती मनी उठाया अमुच्या धीमंता
तुझा अनुग्रह प्रार्थित आम्ही कृपा करी आता!३

इंद्रियाधिपति मन जर झाले अमुच्या आधीन
रामांकित का कधी आढळे पृथ्वीवर दीन
श्वासोच्छ्वासी नाम स्फुरवी शुद्ध करी चित्ता!४

वीरांचा तू वीर प्रसंगी दासांचा दास
शक्ति बाणता अंगी निष्प्रभ ठरतो यमपाश
चिरंजीविता सेवाधर्मा दिलीस हनुमंता!५

आलस्यावर गदा हाणुनी करी चूर्ण चूर्ण
कर्मि कुशलता, समता चित्ता लाभो संपूर्ण
श्रीरामाला हाती धरुनी निधडा करि आता!६
(कवि श्रीरामा)

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.४.१९८१

No comments:

Post a Comment