भाग्यवंत तुजसम तूच पुत्र ईश्वराचा -
जाण जाण जीवा माझ्या 'अर्थ' जीवनाचा!ध्रु.
तुझे ईश्वराशी नाते असे जोडलेले
तयानेच विश्वासाने जगी धाडलेले
कार्य असे काही कर हो धनी कौतुकाचा!१
भार नको मानू कर्मा धर्म तोच दैवी
सज्जनास वश हो विश्व तो खरा सुदैवी
हास बोल मुक्त मनाने मंत्र हा सुखाचा!२
दर्शनास न लगे जावे सदा मंदिरात
इथे तिथे बघ भगवंता तुझ्या जीवनात
देह शुद्ध राखी तो रे निवारा हरीचा!३
आजवरी जरी चुकला तू सुधारणा होई
भाव भाविकाला नित्य पुढे पुढे नेई
तुझा वारसा प्रेमाचा नसे तो धनाचा!४
नदी वाहणारी गंगा तसा तू हि शुद्ध
नाम घेत गोपालाचे कसा असे बद्ध
मोक्षलाभ या देही तू सुखे घ्यावयाचा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.९.१९८९
No comments:
Post a Comment