Thursday, April 2, 2020

स्मरू या गुणसागर श्रीराम..

श्रीराम! गुणांचा सागर
त्याचे भाषण मधुर! त्याचे वागणे उत्साह वाढविणारे! त्याचा दयाभाव आगळा! त्याचा पराक्रम शब्दांच्या पलीकडचा. अशा श्रीरामाला आपण पाहिले नाही पण भरपूर ऐकले आहे आणि त्याचे वास्तव्य आपल्या अंतःकरणात आपल्या जन्मापासूच आहे.
- तर अशा गुणसागर रामाचे स्मरण करू या.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

स्मरू या गुणसागर श्रीराम! ध्रु. 

शांत, सुशीतल ,सुमधुर भाषण
करुणावचने, अमृतसिंचन
श्रांतांचा विश्राम!१

अवघे जीवन प्रखर साधना
कण कण झिजणे गती चंदना
तप्तासी आराम!२

पतितांचा उद्धार करावा
निरर्थकाला अर्थ मिळावा
दीनोद्धारक राम!३

हा भरताचा, शत्रुघ्नाचा
सौमित्राचा, सुग्रीवाचा
सख्यभाव अभिराम!४

सुता धरेची, पुत्र नभाचा
संगम गमला अलौकिकांचा
जानकिजीवन राम!५

वनवासी जन जवळ धरावे
एकविचारे एकवटावे
कुशल संघटक राम!६

यौवराज्य वा विजनवास वा
समान दोन्ही मनी गारवा
ऐसा शांताराम!७

सत्यपथाचा राघव यात्रिक
माणुसकीचा राघव मांत्रिक
पुरुषोत्तम श्रीराम!८

शौर्य शोभते विश्वासासह
राम धनुर्धर निज अनुजांसह
विराग्रणि श्रीराम!९

देही असला तरी विदेही
तयास वरिते ती वैदेही
हा तर आत्माराम!१०

ज्याच्या त्याच्या अंतरि आहे
मना सज्जना शोधुन पाहे
दासांचा श्रीराम!११

असुनि नसावे, नसुनि असावे
कार्य करावे, दूर राहावे
कमलपत्र श्रीराम!१२

कृतीत यावा एक एक गुण
श्रीरामाचे हे तर पूजन
पूजक पूज्यहि राम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
भीमपलास

No comments:

Post a Comment