Friday, April 10, 2020

वनवास..


नसे सजा ती, असे सुसंधी
घडे वनाचा वास!ध्रु.

जीवनविद्या शिकता येते
सृष्टीशी जवळीक साधते
आज्ञापालन मायपित्यांचे
समाधान हे खास!१

पर्णकुटी बांधावी आपण
कंदमुळांचे करणे भक्षण
शक्ति वाढते सोसायाची
सहजचि हा अभ्यास!२

साधे जीवन त्याची गोडी
आता कळते थोडी थोडी
भोगविलासहि पार विसरले
संधी वैराग्यास!३

वनात चिंतन सुंदर घडते
स्वये स्वतःशी वदता येते
दिव्यत्वाची कितिदा प्रचिती
अपूर्व हा उल्हास!४

तरुलतांचा त्याग जाणवे
महिमा त्यांचा कसा वर्णवे?
काट्यांमधुनी सुमने हसती
दुःखि सुखाचा वास!५

ध्याना बसले जैसे गिरिवर
दृष्टि खिळतसे आकाशावर
काळाची गति वाटे थांबे -
मुनिवदनावर हास!६

परिश्रमच तप ऐसे वाटे
स्वानुभवे समृद्धी येते
तिन्ही ऋतूंचे भिन्नच वैभव
वाढतसे विश्वास!७

व्रतस्थ जीवन वनवासाचे
संयमनाचे, अभ्यासाचे
व्रत हे वरले बुद्ध्या खडतर
सुखद वनाचा वास!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment