Wednesday, April 1, 2020

केशवा ही चरणी प्रार्थना..



केशवा ही चरणी प्रार्थना
शक्ति दे संघशक्तिवर्धना!ध्रु.

तुझा कळवळा, तुझा जिव्हाळा
तुझा त्याग अन् स्नेह वत्सला
पूजक व्हावा पूज्यासमची
नाही दुसरी कामना!१

दे तव निष्ठा, दे तव साहस
दे तव आशा, विशुद्ध मानस
ध्येयवेडही तुझे मिळू दे
गती मिळू दे संघटना!२

तव गुणकीर्तन नवसंजीवन
तुझी आठवण दे प्रोत्साहन
कर्मदीप जो करी निरविला
उजळो विश्वी कणा कणा!३

ज्योत अंतरी सतत तेवु दे
मनामनांचा स्नेह जुळू दे
कार्य अखंडित हातुनि व्हावे
याच साठि दे चेतना!४

मनास लागो सतत टोचणी
शरीर होवो खोड चंदनी
क्षणहि न वाया जाऊ द्यावा
अभेद्य ठरु दे संघटना!५

समष्टीत व्यक्ती विलयावी
मी तूपण ही जाण नुरावी
अशी कृपा दे, ऐसा वर दे
अद्वैताच्या आचरणा!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment