Friday, December 31, 2021

जोगन विठामाई

जोगन विठामाई!
कनवाळू आई!ध्रु.

भजन शिकव गे
विरक्ति दे गे 
धावत ये आई!१

सरो देहपण 
उमलो जीवन
कमल तुला वाही!२

इथली दीक्षा
पूर्ण परीक्षा
रक्षण कर आई!३

या अवनीवर
तुझाच वावर
जाणिव हो आई!४

नवनाथ कृपा
करविते तपा
वंदन घे आई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०२.१९८६

Wednesday, December 29, 2021

महाराजा ऽ महाराजा


महाराजा, महाराजा, स्वीकारा अमुची पूजा!ध्रु.

रूप देखणे, मधुर हासणे
हंसासम डौलात चालणे
हृदया भिडती अपुली वचने, साधेपण दे साजा!

शुचिता करते निवास येथे
भगवंताचा सुगंध येथे
वेदांता ये रंजकता हो वैराग्याच्या राजा!

अंतरंग उतरले भाषणी
मातृप्रेमा विलसे नयनी
अपुली वाणी नित नामार्पित लोकांच्या ये काजा!

जना पाहिले, जना जाणले
दीनदुःखिता हृदयी धरले
परमार्थामधि पुढे ढकलले तरि ना गाजावाजा!

गुरुराया  तुम्हि , तुम्ही माउली
प्रपंचतप्ता शीत साउली
प्रपंच जोडुनि परमार्थाशी अनुभव दिधला ताजा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील हे एक काव्य)

Monday, December 27, 2021

हे सह्याचल, जय सह्याचल!



कोटि कोटि कंठात निनादे
तुझाच जयजय, तुझाच जयजय
हे सह्याचल, जय सह्याचल!ध्रु.

अग्नी नि पृथ्वी यांचा संगम
त्यातुन घडला तुझाच उद्गम
प्रचंड राकट कभिन्न काळा
दृष्टि स्थिरावे तुजवर निश्चल!१

सुंदर नाजुक लेणी कानी
गुंफिली कुणी सोनारांनी
तुजवर वर्षत शतजलधारा
न्हाउन निघसी प्रसन्न प्रेमल!२

तव अंगावर हिरवा शेला
घनमालांनी पांघरलेला
छाती तव भरदार पर्वता
मूतिर्मंत तू पौरुष केवळ!३

जो तुज स्मरतो पावन होतो
विसरे जो दास्यात अडकतो
तू स्वतंत्रता तूच अस्मिता
तूच तुझ्यासम जगि उर्जस्वल!४

हृदयी दडावे स्कंधि चढावे
अमृत प्यावे बलाढ्य व्हावे
तुझ्यासारखा गुरू न दुसरा
अतीव दाटे अंतरि तळमळ!५

खोल दऱ्या, अत्युन्नत शिखरे
अवघड लवणे, भयाण विवरे
हिरवट, हेकट, बिकट गिरी तू
रूपवर्णना थिटे शब्दबल!६

सहस्रगंगाधरा पर्वता-
रम्य नि भीषण तुझी भव्यता
भात, नाचणी, हिरवी मिरची
परिसरात घमघमला परिमल!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील हे सह्याचलावरील काव्य)

Sunday, December 26, 2021

श्री दत्तात्रेय स्तवन


सत्त्व रज तम। ऐसे तीन गुण
मूर्ती ही त्रिमुखी। श्रीदत्ताची! १

मुखे तीन परि। देह तो एकच
एकाच देहात। आले सारे!२

देहास चालवी। अदृश्य जी शक्ती
तिचीच जाणीव। असो द्यावी!३

उत्पत्ती नि स्थिती। विलयही तैसा
विश्वाची धारणा। तिघांमुळे!४

हृदयमंदिरी। आले गुरुदत्त
नित्याचे दर्शन । भाविकाला!५

अविद्या घालवी। स्वरूपाचे भान
ज्या त्या साधकाला। अभ्यासाने!६

अभ्यासा बैसवी। सद्गुरु श्रीनाथ
म्हणून प्रत्यही। गुरुवार!७

अत्रि पिता थोर। आई अनसूया
दाम्पत्याच्या घरी। प्रकटले!८

सदैव हा मुक्त। सदैव निश्चिन्त
सदैव श्रीदत्त। हिंडतसे!९

द्वंद्व न बाधते।  श्रीमान हा योगी
प्रशांत विरागी। गुरुनाथ!१०

तीन मुखे त्याला। तैसे सहा हात
विविध त्या वस्तु। बाळगल्या!११

करी जपमाळ। तशीच ती पोथी
कमंडलू शोभे। एका हाती!१२

डमरू तो हाती। त्रिशूळ ही करी
एका हाती गदा। चातुर्याची!१३

चारी वेद तैसे। होऊनिया श्वान
अवतीभोवती। विराजती!१४

सतत भ्रमण। खूण ही गुरूची
आर्तांची ती दुःखे। निवारिती!१५

ओंकाराचा जप। चिंतांना पिटाळी
वाजतसे टाळी। आनंदाची!१६

गाणगापूर, वाडी। तैसे औदुंबर
स्थाने तीन सारी। आवडीची!१७

विभूती चर्चावी। गळ्यात ती माळ
शांतवाया जीवा। बाळगावी!१८

पादुका मस्तकी। आदरे धराव्या
आनंदाचे अश्रू। झरू द्यावे!१९

स्नान तना मना। घालतसे कृष्णा
अपार करुणा। सद्गुरूंची!२०

सद्गुरुकृपेने। श्रीरामा ये जाग
श्रीदत्ते प्रसाद। दिधलासे!२१

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०१.१९९१

Tuesday, December 21, 2021

स्वर्ग पातला भूमिवरी!



छत्रपती शिवरायांसारखा अजोड नेता लाभल्याने मराठ्यांच्या मनी दुर्दम्य आत्मविश्वास फुलला. परचक्राची धास्ती राहिली नाही.  बारा मावळ स्वराज्यात सुखाने नांदू लागले.

शिवरायांनी केवळ तलवारीला धार लावण्यासच प्रोत्साहन दिले असे नाही, शेती, न्यायदान, पाणी पुरवठा इकडेही त्यांनी लक्ष पुरविले. अवघ्या बारा मावळाचे रूपच पालटून गेले. 

शिवारं डुलू लागली, शेतकरी आनंदभराने गाऊ लागला..
------ ------ ------- -------

बारा मावळ हसू लागला, लक्ष्मी नांदे घरोघरी
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!

गाई वासरे येथे रमती
नव्या गोकुळी सुखा नच मिती
गोरस पिउनी गोपाळांची सेना सजली पहा तरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!

सहस्र कुदळी पडता मिळुनी
नीर खळाळे पाटांमधुनी
वाऱ्यावरती शिवार डुलता मनी हरखला शेतकरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!

रावण आता कुणी न उरले
तस्कर सारे तिमिरी दडले
न्यायनिवाडा बघण्या यावे भूप विक्रमे धरेवरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!

राज्य आपुले शेतकऱ्यांचे 
धारकऱ्यांचे वारकऱ्यांचे
देवराज्य या वानिती अवघे, हर्ष कोंदला दिगंतरी!
शिवबा नेता भला लाभता, स्वर्ग पातला भूमिवरी!
नंदनवन जनमनांतरी!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, December 20, 2021

तुझे स्मरण राहु दे! रामा!


तुझे स्मरण राहु दे! रामा! ध्रु.

असो अमीरी असो फकीरी
करी घडावी तुझी चाकरी
दास तुझा होउ दे!१

देह यातना सोशिन मोदे
गाइन भजना मी आनंदे
नाम मधुर गाउ दे!२

विषयचोर जर घरात आले
रोखित तव स्मरणाचे भाले
विघ्न चुरा होउ दे!१

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, December 16, 2021

नित्य नवी गीता सांगे पार्थसारथी!

सूत्र दिले हरिच्या हाती
नित्य नवी गीता सांगे पार्थसारथी!ध्रु.

पार्थ होउनी मी जेव्हा कृष्णशरण व्हावे
ज्ञान आतुनी उमलावे, मने शांत व्हावे
कृती कृती नकळत घडवी हरि सत्कृती!१

कधी तरी जाई काया खिन्न काय व्हावे?
गुप्त परि आहे आत्मा आत्मरूप ध्यावे
'तोच तोच तू परमात्मा' देत जागृती!२

तुझे कार्य आहे धर्म प्राण पणा लाव
हीच हीच ईश्वरपूजा ओत भक्तिभाव
यज्ञचक्र अविरत फिरण्या कृष्ण दे गती!३

मार्गदर्शनाच्यासाठी पहा आत आत
अंतरात रंगे कृष्ण तोच देइ हात
मने मने सुमने करते कृष्णसंगती!४

सुखदुःखा कारण कर्म कशाला अहंता?
भाविकास हरि दे भाव, नको करू चिंता
गुणातीत तुज व्हायाचे वाट चाल ती!५

तोल मनाचा जो राखे, तया नाव संत
बगीच्यात त्याच्या फुलला सदाचा वसंत
असा होइ योगी सांगे रुक्मिणीपती!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.१२.१९८७

Wednesday, December 15, 2021

शरण शरण स्वरूपनाथा!

शरण शरण स्वरूपनाथा!
शरण शरण स्वरूपनाथा!

आम्हां तप्तां तूच सावली
चुकल्या वत्सा तूच माउली
सत्वर पाव अनाथा!१

पावस झाले दुजी आळंदी
ते रमलेसे अभंग छंदी
नमना लवितो माथा!२

प्रेमळ माते, मूर्त लीनते
हे प्रसन्नते सुभग चारुते
थकलो तव गुण गाता!३

ध्यास लावला तू सोऽहंचा
कोमल केली अमुची वाचा
महदुपकार अनंता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०५.१९७४

बाळ जन्मले!

आशीर्वच सद्गुरुचे सत्य जाहले
बाळ जन्मले! बाळ जन्मले!ध्रु.

ईश्वरीय थोर दया
पातली रहावया
विष्णुपंत गहिवरले! भाग्य उदेले!१

मी माझे मावळता 
तू तुझे उगवता
विरक्तिगंध  धुंद तेथ मुक्त दरवळे!२

निर्मला सुकोमला
माउली सुमंगला
अमोल लाभ जाहला, हास्य उमलले!३

सोऽहं स्वर लागला
ज्ञानवृक्ष बहरला
मोदफळे लहडली, विश्व विनटले!४

शारदीय ज्ञानदीप 
तेवतसे अति समीप
तिमिर मावळे क्षणात सदन उजळले!५

गृहि येता नारायण
पावस हो अति पावन
विष्णु रुक्मिणी कृतार्थ जगति जाहले!६

विष्णुपंत अति भाविक
मितभाषी मृदु वचनिक
नामनिष्ठ महातपी भरुनि पावले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, December 12, 2021

घराला मंदिरपण यावे!

 

स्वप्न हे आकारा यावे
घराला मंदिरपण यावे!ध्रु.

इथे तिथे गोपाळ दिसावा
अंतरातला कृष्ण हसावा
मानस उजळावे!१

भेटीलागी ओढ असू दे
संवादाची रुचि असू दे
साधक जन व्हावे!२

बहिरंगाला महत्त्व नाही
अंतरंगि श्रीरंगच येई
अंतर्मुख व्हावे!३

उपासनेने पालट होतो
विकार विरतो विचार सुचतो
शहाणपण यावे!४

बहुतांची अंतरे राखता
तनास तृप्ती मना शांतता
अनुभवास यावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जून १९८३

Sunday, November 28, 2021

भक्त मी होईन का?


तोषवी जे अंतरंगा प्रेम ते लाभेल का?
भक्त मी होईन का?ध्रु.

तृषित होउनि धावलो, परि प्यास नाही भागली
जे अशाश्वत तेच भुलवी फजिति ऐसी जाहली
आंधळा डोळे असूनी दृष्टि ती लाभेल का?१

ध्येय ऐसे पाहिजे जे उंच नेते मानवा
तेच साधन जे जिवासी भेटवीते त्या शिवा
कळुनिया कल्याण मजसी प्रगतिपथि राहीन का?२

भ्रांति फिटु दे, मोह सुटु दे चित्त भजनी रंगु दे
आवडीने रामनामा भक्तिभावे गाऊ दे
देह ना मी देव तो मी अनुभवा येईल का?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०३.१९७४
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८४ (२४ मार्च वर आधारित काव्य)

मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये? आमचे ध्येय असे असले पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. प्रपंचातील नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असे वाटत असते व त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही आमची कल्पना नाहीशी व्हावयास पाहिजे. प्रपंचाची आस जोपर्यंत आम्हाला आहे तोवर भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही.

Tuesday, November 16, 2021

सहभोजन रंगले!


सहभोजन रंगले! रंगले! सहभोजन रंगले!ध्रु. 

पंक्तीमागुनि पंक्ती उठती
गप्पासप्पा मुदे चालती
भेद सर्व विरले! रंगले! सहभोजन रंगले!१

पतित न कोणी सगळे पावन
हसे अंतरी श्रीनारायण
फुलली मोदफुले! रंगले! सहभोजन रंगले!२

घ्या हो! घ्या हो! आग्रह चाले
कृतार्थतेने डोळे भरले
सुतक युगांचे फिटले! रंगले! सहभोजन रंगले!३

पर्वकाल पातला पातला
स्नेहमळा बहरला बहरला
अंतरंग धवळले! धवळले! सहभोजन रंगले!४

अनुकरणीय स्तुत्य कल्पना
समाजकार्या मिळे चालना
मानस परिमळले! रंगले! सहभोजन रंगले!५

सुधारणेचे अमोघ साधन
स्नेहभोजनाचे संयोजन
आत्मतत्त्व कळले! रंगले! सहभोजन रंगले!६

मनामनांची खुलली दारे
घरोघरी तर हसले तारे
भेदभाव संपले! रंगले! सहभोजन रंगले!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(सावरकरांनी रत्नागिरी मधे जे समाज सुधारणेचे कार्य केले त्यातील सहभोजनांवर आधारित हे काव्य)

Sunday, November 7, 2021

मार्गे हळू हळू चाला! मुखाने साईनाम बोला!

मार्गे हळू हळू चाला!
मुखाने साईनाम बोला!ध्रु.

श्रीसाई जय साई
ठाव मला दे पायी
अश्रू भिजवु देत गाला!१

करावे हाताने काम
मुखाने घेताना नाम
निरंतर साई रखवाला!२

संकटि धीर मना देत
पोचवी मुक्कामा थेट
साई सावरतो तोला!३

हसुनी जरासेच गाली
वाटते दृष्टि रोखलेली
माय ही सांभाळीत बाला!४

साई नाथांचा नाथ
तयाची काळावर मात
पदी नत धरणीही अचला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.१०.१९७८

Sunday, October 10, 2021

मी विद्यार्थी आहे..



ही तर शालामाता माझी
मी विद्यार्थी आहे!ध्रु.
मी विद्यार्थी आहे याचे
भान सदोदित आहे!

आधी वंदन मायपित्यांना
सद्गुरूच ते माझे
जवळी घेते शालामाता 
कौतुक करते माझे
          मी विद्यार्थी आहे!

डोळे मिटता पुढे ठाकते
भगवंताची मूर्ती
मौन पाळता ध्यान साधते
प्रसन्न होते स्फूर्ती
            मी विद्यार्थी आहे!

मी नच माझा, मी सगळ्यांचा
सांगे शालामाता
विज्ञानासह भाव फुलविते
माझी शालामाता
               मी विद्यार्थी आहे!

संयम आणि शिस्त पाळता
हसते शालामाता
ज्ञान घ्यावया उत्सुक होता
भरभरूनी दे माता
              मी विद्यार्थी आहे!

शाला नाही दगड विटांची
चैतन्याचा स्त्रोत
पराक्रमाची कला गुणांची
गंगोत्री ही होत
तिचा पुत्र मी होत - 
             मी विद्यार्थी आहे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.१.१९८२

Thursday, October 7, 2021

देवीपुढे बसावे..



देवीपुढे बसावे, ध्यानी तिच्या रमावे!ध्रु.

मिटताच दोन डोळे
मूर्ती तिची झळाळे
ते ध्यान पाहताना स्थलकाल विस्मरावे!१

राणा प्रताप शिवजी
ठरले रणात गाजी
देवी तुझ्या कृपेने चैतन्य ते स्फुरावे!२

जाणूनि भाव माझा
ऐसा न भक्त दूजा
जे बोलणे तियेचे माझ्याच कानि यावे!३

शस्त्रे हवीत माते
निजकार्य साधण्याते
दिपवी जगास ऐसे माझ्या करी घडावे!४

जरि रौद्र क्रुद्ध मुद्रा
मज माय ही सुभद्रा
सौदामिनीच देवी ते तेज अंगि यावे!५

जननी सुपुत्र नाते
भीती मना न शिवते
चित्ता मिळो विसावा देवीस नित्य ध्यावे!६

बलवंत, कीर्तिवंत
गुणवंत, ध्येयवंत
वाटे मनास माझ्या मी विश्वव्यापि व्हावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 3, 2021

दुःख दडवावे, सुख दाखवावे..

दुःख दडवावे, सुख दाखवावे
"देहदुःख हेच सुख" सुखे समजावे!ध्रु.

माझे दुःख, माझे सुख विचार हा कोता
सुखदुःख विश्वाचे हा भाव असे मोठा
'घडे ते ते कल्याणाचे' सूत्र उमजावे!१

नसे अंत वेदनांना - नये देऊ लक्ष
नाम घेई राम त्याचा राम घेई पक्ष
आत्माराम आत राहे तिथे लक्ष द्यावे!२

सांजवेळ वाटे जेव्हा जोड दोन्ही हात
मिटोनिया डोळे राजा राहणे निवांत
समाधान ज्याचे त्याने पदरात घ्यावे!३

जन्ममरण त्याच्या हाती शिरी भार फोल
देहभाव सरला त्याचा सावरला तोल
ज्ञानोबाच्या, तुकोबाच्या संगती राहावे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१२.२००३

Saturday, October 2, 2021

अटलजींवरील हिंदी कविता

खडे रहो अपने पथ पर तुम
आगे बढने के लिए
याद रखो हो अमृतपुत्र तुम
गीता जीने के लिए।१

मैं विवेक आनंद है मुझ में
आत्मा पर जागृत विश्वास।
प्रकाश नयनों में है उतरा
संथ हुई है मेरी साँस।२

उत्तर दक्षिण पूरब पश्चिम
मातृभूमि पर चरण चले
विचार भारत तथा विश्व का
चिंतन के हैं कमल खिले!३

कृतज्ञ हूं मैं परमेश्वर का
मिली भगिनीयाँ बंधु मिले
सरस्वती आ बैठी जिव्हापर
वच से जन के हृदय हिले।४

हर नरेंद्र स्वामी बन सकता
रामकृष्ण यदि मिल जाए।
प्रभुसेवा जनसेवा सन्मति
कृति कृति में दिख जाए।५

अपने को ना क्षुद्र समझना
कमी यदि है निश्चय की
सत्य यत्न साकार रामजी
कौन बड़ाई तनमन की।६

कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.१२.२००३

महात्मा फुले!

महात्मा फुले! महात्मा फुले!ध्रु.

तेवली ज्योत ज्ञानाची
उजळली मुखे दीनांची
सर्वांचा निर्मिक  डुले!१

सत्याचा करु या शोध
ऐक्याचा होइल बोध
भक्तीचे पिकवू मळे!२

जर शिकल्या लेकी सुना
आनंद न मनि माइना
हे धडे आधी गिरवले!३

मोडाव्या जाती पाती
जुळण्याला रेशिमगाठी
प्रगतीला जग हे खुले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
४.११.२००३

शंकरा आरती गाऊ!

शंकरा आरती गाऊ!
अध्यात्मी अनुभव घेऊ!ध्रु.

अंतरी सद्गुरु वसतो
सद्विचार सहज स्फुरतो
गुरुनाथनाम नित गाऊ!१

बलभीम शिकवितो भक्ती!
मग हव्या कशाला युक्ती?
नित जगाधाकटे होऊ!२

भाविका उद्धरी भाव
ती तारक नामी नाव
समरसून वल्हवू वल्हवू!३

बाह्या नच केव्हा भुलणे
अंतरी जाउनी बसणे
निजरूप सुजनहो पाहू!४

श्रीराम जरी हा दूर
उसळले भक्ति काहूर
आनंद देउ अन् घेऊ!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.७.१९८१

Monday, September 27, 2021

दयाळू, कृपाळू माझा ज्ञानेश्वर!ध्रु. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर!!

दयाळू, कृपाळू माझा ज्ञानेश्वर!ध्रु.
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर!!

आनंदाचा कंद हा
बोधाचा मकरंद हा
मनाचा मवाळू माझा ज्ञानेश्वर!१

आत्मानंदी दंग हा
भक्ति सागरी डुंबत हा
मायमाऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर!२

गीता सांगे सकलांसी
घास भरवितो बालांसी
परब्रह्म हा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर!३

महाविष्णुचा अवतार
सखाच माझा साचार
योगिराज हा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर!४

बालपणी जे सोशियले
तेच पुढे ग्रंथी दिसले
सोशिकपण श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर!५

अद्वयवैभव भोगत हा
नाथपंथिचा यात्री हा
चिंतामणि श्री ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर!६

युगांतदुःखा प्राशियले
प्रखर विरागा साहियले
मुळी मुक्त हा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.९.१९७६

माणुसकीने वाग माणसा साई सांगतो!

माणुसकीने वाग माणसा
साई सांगतो!ध्रु.

हिंदु- मुस्लिम- शीख - इसाई
देह सारखा भेदच नाही
अभेद दाखवितो!१

उदी कपाळी लावा आता
राखच अंती सत्य तत्त्वतः
विरक्ति बाणवतो!२

घेउनि झोळी भिक्षा मागत
निमित्त भिक्षा, दुनिया पाहत
दत्तगुरु फिरतो!३

टोचुन खोचुन नकाच बोलू
खाल कुणाची नकाच सोलू
प्रेमपाठ देतो!४

हृदय मंदिरी देव राहतो
तो चालवितो तोच करवितो
एकनिष्ठ करतो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.१०.१९७८
 :  

राम कृष्ण हरि! राम कृष्ण हरि!

राम कृष्ण हरि! राम कृष्ण हरि! ध्रु.

तो आतुनि घेई नाम
करी सोपे सोपे काम
भवभयास देव निवारी!१

मन निर्मळ निर्मळ होई
हरि जवळी जवळी राही
प्रभु भक्ताचा कैवारी!२

जर अखंड चाले नेम
भक्ताचा योगक्षेम
वाहतो स्वये गिरिधारी!३

नम्रता हीच संपत्ती
मुखि माधुर्याची वसती
श्रीहरिची किमया न्यारी!४

जे जे दिसताहे भूत
ते वाटतसे भगवंत
अनुभवा गड्या अवधारी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१०.१९८६

Sunday, August 1, 2021

सोऽहम्



सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्!ध्रु.

मी नभ, मी स्थल, सरिता सागर
मी परमात्मा, कुणी न पामर,
विश्वा व्यापुनि उरलेला जो -
सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्!१

निर्गुण आहे, सगुण तसा मी
निराकार साकार ही मी मी
श्वासोच्छ्वासी जाणवतो जो
सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्!२

मी प्रसन्नता, मी नीरवता
मी शीतलता, मी वत्सलता
अनंत जीवी जो परमात्मा
सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्!३

गंधित वारा, शीतल धारा
मोर पिसारा, वृक्ष फुलोरा
कणाकणातुनि आला बहरा
सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्, सोऽहम्!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, July 20, 2021

कीर्तन एकादशी



मायतात विठ्ठल रखुमाई
घर पंढरी होई
कीर्तन एकादशी साजरी
तो करवुन घेई!ध्रु.

महिन्यातुन एकदा जमावे
हरिदासाचे श्रवण करावे
ऐकुन घेउन भजन म्हणावे
सुधारणा होई!१

ज्ञाना दिसतो ओवीमधुनी
तुका हासतो अभंगातुनी
मोरोपंतहि आर्येमधुनी
प्रसाद करी येई!२

कीर्तन रंगे श्रोत्यांसंगे
डुलती माना जीव तरंगे
विवेक आपोआपच जागे
पुनर्जन्म होई!३

येथे येता श्रवता विठ्ठल
चंचल मनही होते निश्चल
भक्तीचा दरवळतो परिमल
अनुभवास येई!४

अवघड कोडी श्रवणे सुटती
कलह संपती नाती जुळती
वाढत जाते गुणसंपत्ती
सिद्धि नव्हे का ही?५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.११.२००१

Sunday, July 18, 2021

जाता येता भगवंता रे गीता मी गाईन हर्षखेद मावळता सगळे आनंदे नाचेन..

जाता येता भगवंता रे गीता मी गाईन
हर्षखेद मावळता सगळे आनंदे नाचेन!ध्रु.

कृष्ण कृष्ण जय धर्म तिथे जय
मी आत्मा हा झाला निश्चय
अनंत राघव, अनंत यात्रा, पुढती पुढती जाईन!१

कर्म न टळते सुसंधि असते
सराव घडता सुंदर बनते
स्वकर्मकुसुमे तव चरणांवर आनंदे वाहीन!२

जगात येणे, जगा सोडणे
स्वाभाविक जर कळणे वळणे
देहाहुन या मने निराळा तुझ्या कृपेने राहेन!३

संस्कारच गीतेचे वाचन
संस्कारच गीतेचे गायन
मोहा झटकुन अरे मोहना निर्मोही होईन!४

कर्तव्यातच मोद संचला
पालन करता प्रज्ञा अचला
आत्मज्ञानाच्या ढालीवर प्रहार सारे झेलीन!५

परमहिताचे इथे सांगशी
निर्णय पार्थावरी सोडशी
स्वातंत्र्याचा खरा अर्थ मी परोपरीने जाणेन!६

गीता गंगा, यमुना गीता
अवगाहन संगमात घडता
अलिप्ततेचे भस्म चर्चुनी व्यवहारीही वागेन!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 8, 2021

घे मना झेप तू अज्ञाती! घे तना झेप तू अज्ञाती..


घे मना झेप तू अज्ञाती
घे तना झेप तू अज्ञाती!ध्रु.

कालोदरि शककाल संपले
कालोदरि कल्लोळ उसळले
देहदंड ज्या प्रदीर्घ होणे
तयेच करणे चमत्कृती!१

त्रिकालदर्शी योगी बन तू
तू अनंत हा अनुभव घे तू
एकवटूनी शक्ती सारी
साधुनि घे तू झणि मुक्ती!२

कालपुरुष कानात सांगतो
मानव जागृत सावध होतो
मुहूर्त कसला शोधत बसशी
नको बाळगू काहि क्षिती!३

अज्ञाताचा प्रवास सारा
सागर करितो तुला पुकारा
कशास बघसी मागे पुढती
करू नको व्यर्थच खंती!४

दूर टेकले गगन समुद्रा
जपत रहा मुक्तीच्या मंत्रा
अंधुक आशा याच पळाची
पहाट पुढती फटफटती!५

स्वातंत्र्याचा भार शिरावर
शिवरायांचा मिळे तुला वर
सागरात घे झोकुनि ऐसे
येईल करि मुक्ती मोती!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, July 6, 2021

ज्ञानोबा माझ्या ऐक ऐक बासरी अंतरी नांदतसे श्रीहरी

इतिहासाची आवृत्ती सारखी होत असते म्हणतात.  ज्ञानदेवाची भूमिका ठरली पार्थाची!  यावेळी निवृत्ती कृष्णमेघ होऊन  ज्ञानावर बरसला - दाहक वणवा शांत शांत झाला. अवकाशात बासरीचे सूर उमटले - निवृत्तीने ज्ञानदेवांच्या अंत:करणाच्या मुरलीत फुंकर मारली. ज्ञानदेवाला कवित्वाविषयी प्रोत्साहन दिलं - जगाला मानवता धर्म शिकवण्याचे जीवित कार्य सांगितलं.
काय होतं निवृत्तीचं आवाहन?
------------oOo-------------

ज्ञानोबा माझ्या ऐक ऐक बासरी
अंतरी नांदतसे श्रीहरी!ध्रु.

उपजतकवि तू तत्त्वज्ञानी
जा रंगुनिया भजनी गानी
जन्म-मृत्युची कशास चिंता?
कर्तव्या आचरी!१

कृष्णाष्टमिचा जन्म तुझा रे
मुखात तुझिया वेणुस्वर रे
जागव जागव कवित्वशक्ती
आज्ञा ही ईश्वरी!२

आवाहन कर सद्भावांना
सोड मूकता वद रे ज्ञाना
भजन निरूपण बरसो श्रावण
तृषार्त अवनीवरी!३

ऊठ पसर रे दोन्ही बाहू
दे आलिंगन मजसी भाऊ
वणवा आता नुरेल चित्ती
झरतिल अमृतसरी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(तिलक कामोद)

Sunday, July 4, 2021

पुनःश्च हरि ॐ, पुनःश्च हरि ॐ

पुनःश्च हरि ॐ, पुनःश्च हरि ॐ 

जनसेवेचे व्रत पत्करले 
सत्पक्षाचे कंकण धरले 
वाण सतीचे शिरी घेतले 
मनात मंत्रा घुमवित बसतो - हरि ॐ  
पुनःश्च हरि ॐ 

संकटि होते सत्त्व परीक्षा
दिव्य देशभक्तीची दीक्षा 
आत्मबलाची याचित भिक्षा 
कण कण झिजु दे कायाचंदन - हरि ॐ
पुनःश्च हरि ॐ 

सत्कार्याचा ईश्वर प्रेरक 
भक्तालागी तो संजीवक 
आशेचा करि उज्ज्वल दीपक 
घनतिमिरी पथ उजळ देखता - आत्मा अवचित गाऊनि जातो 
हरि ॐ हरि  ॐ

आज वाटते जीवेभावे
कार्य अखंडित सुरु असावे 
स्फूर्तीचे इंधन लाभावे 
प्रसन्नतेच्या जलबिंदूनी समाधान अक्षय मिळवावे 
हरि ॐ हरि  ॐ

बळे पोत केला जरि खाले 
ज्वाला वरती तरी उफाळे 
विरोधेच चैतन्य सळसळे 
स्वधर्म अनुसरिता मी प्रतिक्षण करेन प्रभुचे नामोच्चारण 
हरि ॐ हरि  ॐ

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०३.०२.१९६८ 

    

Thursday, July 1, 2021

घरा घरातुन फॅमिली डॉक्टर सहजच पोचावा!

घरा घरातुन फॅमिली डॉक्टर
सहजच पोचावा!
जगावयाचे सुंदर जीवन
हुरूप वाढावा!ध्रु.

गप्पा गोष्टी हसतच घडता
दोष दिसुन यावे
सुधारीन माझे मजला मी
अनारोग्य जावे
वडीलधारा असाच माणूस सदैव जोडावा!१

विश्वासाचा अमोल ठेवा
बलवतीच श्रद्धा
रोगापासुन नक्की सुटका
मुक्तिलाभ बद्धा
आरोग्याचा बालबोध हा सुजना शिकवावा!२

काय करावे? कुणा पुसावे?
मैत्री डॉक्टरशी
ऐकायाचे केवळ त्याचे
कबुली आपणाशी
करी सिद्धता तना मनाची सोबती लाभावा!३

भाव बोलके हसरे डोळे
जुळलेले हात
पुनर्जन्म प्रतिदिवशी ऐसे
वाटतसे आत
आर्थिक लाभासह सुमनांचा मस्तकि शिडकावा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.१.२००४

फॅमिली डॉक्टर


हवे हवेसे फॅमिली डॉक्टर!ध्रु.

कौटुंबिक जिव्हाळा देती
अवघड सोपे करुन सांगती
सदा रुग्णहिततत्पर
हवे हवेसे फॅमिली डॉक्टर!१

नेमकेच ते जाणुन घेती
मनापासुनी पथ्य सांगती
संयम सदैव सुखकर
हवे हवेसे फॅमिली डॉक्टर!!२

आरोग्याची सूत्रे सुचती
रुग्णाला उत्तेजन देती
बोधप्रद प्रश्नोत्तर
हवे हवेसे फॅमिली डॉक्टर!३

विश्वासे विश्वास वाढला
तरीच निम्मा रोग पळाला
हासु करी छू:मंतर
हवे हवेसे फॅमिली डॉक्टर!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.११.२००३

Sunday, June 27, 2021

अर्जुन केवळ निमित्त आहे -


अर्जुन केवळ निमित्त आहे
गीता तुमच्या माझ्यासाठी
गीताई सगळ्यांच्यासाठी!

खचलेल्याला हिंमत देते
झुंजाया प्रोत्साहन देते
जय की पराजय गौणच गोष्टी!

आपण कर्तव्यास भिडावे
फलाशेत ना कधी गुंतावे 
यज्ञ म्हणुन गौरवी जगजेठी!

भगवंताच्या अधरी पावा
त्यास हवा तो स्वर निपजावा
आपण साधन संत समजती!

अहंकार पुरताच लोपला
सोऽहं मनगाभारी घुमला
आत्मचिंतनी रंगे सुमती!

लढुन मरावे, मरुन जगावे
कीर्तिमंत, यशवंत बनावे
गीता गावी जगण्यासाठी!

विकारांवरी मात करावी
यत्ने मिळवू संपद् दैवी
धर्म तिथे जय खचित शेवटी!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.१०.२००४

Sunday, June 20, 2021

नवनाथांची आरति गाता शांतिच शांती चित्ताला

नवनाथांची आरति गाता
शांतिच शांती चित्ताला!
भक्तिभावना अंतरि उमले
सुगंध लाभे जगताला!ध्रु.

अद्भुतता ही इथली ऐसी
विस्मय होई चकित स्वतः
प्रमुदित तन मन, प्रमुदित बहु जन
गंधित होई गंध स्वतः
नवनाथांचे घडते दर्शन
भाविक कणकण मोहरला!१

चित्त शुद्ध तर शत्रु मित्र हो-
प्रेमाने जग जिंकावे
मी माझेपण पुरते लोपुन
तो मी, तो मी उगवावे
नवनाथांच्या कथावाचने
प्रसाद अवचित करि आला!२

श्रीकृष्णाची मधुर बासरी
शिव शंभूचा शंख गमे
डम डम डम डमरू बाजे
दिव्यानंदी जीव रमे
कथा वाचता कळे न कोणा
श्रावण कैसा रिमझिमला!३

भयास आता थारा नाही
निर्धारे मन दृढ झाले
द्वेषाला तर जागा नाही
सारे येथे समरसले
धूप दीप भारती मनाला
सूर गायका सापडला!४

अनाथ जगती कोणी नाही
गुरु माउली गुरु तात
शिष्याला संकटी हात दे
ऐसा नाथांचा नाथ
मालुकवीने ग्रंथलेखने
अमोल ठेवा दिधलेला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०७.१९८६

फादर्स डे निमित्त ग्रंथ भारती मध्ये आलेला लेख " माझ्या आठवणीतले आमचे अण्णा अर्थात श्रीराम आठवले

 



Thursday, June 10, 2021

ठेवू या आपण ध्यानी


भगवंताने देह दिला ठेवू या आपण ध्यानी
अलंकार सद्गुण सारे सजव तनु गुणसुमनांनी!ध्रु.

देहामध्ये राम असे देहामध्ये कृष्ण असे
देहामध्ये भाव असे देहामध्ये ज्ञान असे
भविष्य अपुले नोंदवही ती ती भरु दे सत्कर्मांनी!१

बालवयी शिक्षण घेणे यौवनात उद्यम करणे
प्रौढपणी कौतुक करणे वृद्धपणी शैशव जपणे
हवेहवेसे तर सगळ्यांना नकोनकोसा अज्ञानी!२

भास्कर देई तेजाला वारा सुखवी अंगाला
चंद्र स्फुरवी प्रतिभेला उषःकाल कर्तृत्वाला
सदासर्वदा निसर्ग साथी जाऊ त्याशी समरसुनी!३

षड्रसभोजन सेवावे सात्त्विक सुंदर मन व्हावे
परिश्रमा नच बिचकावे घर्मजले न्हावे धावे
कृतार्थता ये तरी जीवनी अमृत सिंचन  हरिभजनी!४

धर्माने मिळवू दाम संयमात सेवू काम
मोक्ष नांदतो मोदात साधू चारी पुरुषार्थ
सत्संकल्पा श्रीहरि दाता त्या सम ना कोणी दानी!५

नर नारी आत्मा एक राव रंक आत्मा एक
सान थोर आत्मा एक उच्च नीच आत्मा एक
अनेकातले बघू एकपण जग जोडू गुण धाग्यांनी!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.६.१९८७

गीतेला भेटत जाई..


गीतेला भेटत जाई गीता ही आहे आई!ध्रु.

ती भगवंताची वाणी
जग सर्व हिला वाखाणी
साहित्यरूप कृष्णाचे सहवास निरंतर देई!१

हा देह दिसे नि नासे
जाणता दुःखी हे कैसे
अजरामर आत्मा असतो गीता हे सांगत राही!२

जीवन हे युद्धक्षेत्र
ते करणे धर्मक्षेत्र
वैर ना मनी बाळगता मानवा करी रणघाई!३

सांगतो सत्य योगेश
नांदतो आत परमेश
ध्यानात धरी उपदेश त्या जोड कृतीची देई!४

मग सगळी कर्मे यज्ञ
अभ्यासे अज्ञ हि सुज्ञ
अर्जुन ही होतो कृष्ण निजस्वभाव बदलुन घेई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६.८.२००१

Sunday, June 6, 2021

श्रीकृष्ण, श्रीकृष्ण, श्रीकृष्ण गा, गीतार्थ सांगा, गीता जगा.

श्रीकृष्ण, श्रीकृष्ण, श्रीकृष्ण गा
गीतार्थ सांगा, गीता जगा!ध्रु.

कर्तव्य का ते टळते कुणा
आसक्ति हा रोग आहे जुना
द्या स्वार्थ सोडून तो वावगा!१

जो जन्मतो - हे जग सोडतो
या देही, त्या देही नांदतो
दे शोक टाकून राही उगा!२

तो तोल सांभाळ माझ्या मुला
हो शांत भगवंत सांगे तुला
हो योगी आदर्श साऱ्या जगा!३

सत्कर्म तो यज्ञ आहे जगी
सहकार हा मंत्र आहे जगी
हो उद्यमी वीर तू दांडगा!४

ती प्रकृती जाण आधी सुखे
हो साक्षी हा खेळ बघ कौतुके
का भार घेशी माथी फुका!५

जे दिव्य जे भव्य तेही हरि
जे सूक्ष्म, अदृश्य तेही हरी
आस्तिक्य, सद्भाव आधी शिका!६

नैराश्य हे घोर, नामे पळे
कर्तव्य कळले, तेही वळे
नाही पराधीन दावी जगा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०६.२००४

Saturday, June 5, 2021

घराघरात गीता जाऊ दे


घराघरात गीता जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे
गीता गाता उत्साहाचे वारे खेळू दे!ध्रु.

श्लोक सातशे करु या पाठ
विश्वासाने माना ताठ
उक्तीपेक्षा कृती बोलकी घडु दे, घडु दे, घडु दे!१

नव्हे देह मी, मन बुध्दि न मी
सोऽहं तो मी, सोऽहं तो मी
मानसगाभारी या सोऽहं घुमु दे, घुमु दे , घुमु दे!२

संस्कृतभाषा शिकून घ्यावी
ज्ञानेशाची ओवी गावी
आचरणी या पालट सुंदर घडु दे, घडु दे, घडु दे!३

वासुदेव मज करि रे अर्जुन
तुला मागतो हे आवर्जुन
ऐहिक काही दुजी वासना नसु दे, नसु दे, नसु दे!४

विवेक दे रे, विचार दे रे
संयम दे रे,  प्रेम शिकव रे
वत्स होउनी धेनूलागी झटु दे, झटु दे, झटु दे!५

आट्या पाट्या खोखो हुतूतू
विसरवताती मी तू मी तू
कर्मातुन ही क्रीडानंदा लुटु दे, लुटु दे, लुटु दे!६

विकार विलसित राजकारणी
गंगेचेही गढूळ पाणी
हाव हावरी नेत्यांची या सुटु दे, सुटु दे, सुटु दे!७

व्यक्ती पांडव समाज माधव
मी माझेपण देवा घालव
विकासास या विश्व न पुरते गमु दे, गमु दे, गमु दे!८

आहाराची कळु दे युक्ती
आरोग्यहि मग अपुल्या हाती
नरनारींना रणनीती ही शिकु दे, शिकु दे, शिकु दे!९

बालयुवांना वृध्दांनाही
राजांनाही रंकांनाही
उपासनेच्या सामर्थ्यावर जगु दे, जगु दे, जगु दे!१०

कसे जगावे शिकवी गीता
कसे मरावे शिकवी गीता
अंधारातुन प्रकाशाकडे जाउ दे जाउ दे जाउ दे!११

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.७.१९९९

Friday, June 4, 2021

श्रीकृष्णाची भूपाळी



प्रातःकाली हे गोविंदा गंधित ये वारा
गोकुळवासी, हृदयनिवासी उठि उठि यदुवीरा!ध्रु.

इंद्रियरूपी गायींना तू आत आत वळवी
सोऽहं मुरली वाजवुनी तू आत्मसुखी रमवी
साधकास तर नित्य साधना दीपावलि दसरा!१

चित्तचोर तू गोपींना त्या भावमयी केले
असुनि प्रपंची विषयातुनि त्या दूर दूर नेले
गीता शिकवी जीवनविद्या नंदाच्या कुमरा!२

धर्म तिथे जय, नीति तिथे जय, पटले आम्हाला
कर्तव्याने घडतो मानव कळले आम्हाला
बिंदु बिंदु सागरी मिळावा, घडवी योगेश्वरा!३

स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे स्वराज्य हे व्हावे
जागृत होवो दिव्य अस्मिता राष्ट्र उभे व्हावे
तुझे सुदर्शन दे आश्वासन भयास ना थारा!४

मुक्त जन्मला कारागारी अद्भुत हे घडले
परवशतेचे पाश क्षणार्धी खळाखळा तुटले
प्रणाम करि श्रीराम प्रभाती तुजला यदुवीरा!५

रचयिता ; श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०७.१९९५

Saturday, May 29, 2021

वीर विनायक सावरकर


वीर विनायक सावरकर!
वीर विनायक सावरकर! ध्रु.

व्यक्ती जाते, नाम राहते
गुण दाखवते, स्फूर्ती देते
तूच मना घाली आवर! १

मोह मनाचा झटकुन टाक
कर्तव्याची ऐकुन हाक
तोल आपुला तू सावर! २

तळमळ त्यांची तू जाण
आयुष्याचे कल्याण
शक्तीचा अंगी सागर! ३

कच खाणे शतदा मरणे
मनुजाला लाजिरवाणे
ओंकाराचा कर जागर! ४

स्वार्थी तो होतो त्यागी
रुग्णाचा बनतो योगी
नकोस समजू मी पामर! ५

रचयिता ; श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.६.२००१

Tuesday, May 25, 2021

जनांस सांगे प्रल्हाद..


जनांस सांगे प्रल्हाद
घ्या देवाचा आल्हाद!ध्रु.

उठता बसता, जाता येता
नाम स्मरता सरती चिंता
साद तसा ये प्रतिसाद!१

नारायण विश्वात कोंदला
नकळत अंतःकरणी भरला
सुटे न भजनाचा नाद!२

प्रपंचात या का गुंतावे?
उगा जगाशी का भांडावे?
मनास वळवा तुम्ही आत!३

मन जर रमले नामात
इंद्रिय गण ये ताब्यात
आगळाच हा आनंद!४

मीच मला जर ओळखले
नारायण सगळे कळले
तत्त्व यावया ध्यानात!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 22, 2021

गीताई अंगाई गाते


कुशीत घेते हळु थोपटते गीताई अंगाई गाते
कृष्ण कृष्ण म्हणताना आपण पार्थ नि माधव ऐसे वाटे!ध्रु.

शोकाचे काही ना कारण दुःख उरावर कशास घ्यावे?
आपण करतो असे न काही कर्तेपण का शिरी धरावे?
जे ज्याचे त्या करता अर्पण कृष्णबासरी कानी येते!१

जन्मे वाढे झिजते काया मातीमध्ये मिसळुन जाते
रडायचे ना झुरायचे ना आत्म्याशी तर अपुले नाते
तो मी ती मी सोपी शिकवण श्रीगीताई  देत राहते!२

कर्तव्याला आचरिताना नाम मुखातुन झरत राहावे
कर्मे घडती झरझर सुंदर जनार्दनाने प्रसन्न व्हावे
योग वेगळा मुळीच नसतो गीताई ही शिकवण देते!३

खचायचे ना अडायचे ना ध्यान पुरवते अनंत शक्ती
अभ्यासाने भक्तिपथावर भक्तांची नित होते प्रगती
तू माझा मी तुझीच आई असा दिलासा गीता देते!४

कृष्णचरित गीतेतच भरले रहस्य सांगे गीतामाई
विचारवंता संयत भक्ता कृष्ण निरंतर भेटत राही
सदा सर्वदा वाचा गीता, गा गीता प्रेरणा लाभते!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.१०.२०००

Tuesday, May 18, 2021

हरीला भक्तीने बोलवा



हरीला भक्तीने बोलवा
मनाला सत्कर्मी रंगवा!ध्रु.

एक एक गुण मिळता घेता
दुर्गुण तैसा निघून जाता
जीवना अर्थ लाभतो नवा!१

स्वार्थाधिष्ठित नाती गोती
हरिविण दुसरा कुणी न जगती
जिभेला नामामृत चाखवा!२

श्री नारायण जय नारायण 
भागवताचे कर पारायण
याविण छंद न दुसरा हवा!३

जितकी भक्ती तितकी प्राप्ती
भाग्यच समजा विषयि विरक्ती
नारदा सन्माने आणवा!४

वेदनाच जर वाढत गेली
करा कल्पना वाजत मुरली
देहही बदलायाला हवा!५

सुखदुःखातहि संधि साधतो
नामाविण क्षण जाउ न देतो
भक्त तो भगवंताला हवा!६

सदाचार सवयीचा होता
श्रीकृष्णासम लाभे नेता
अर्जुना पार्थसारथी हवा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९९६

Sunday, May 16, 2021

चिरवियोगाने दिलेला धडा..

जे गेले ते पुन्हा न येते रडू नको तू झुरू नको
उरले त्याची घेई काळजी, जपणे जपणे सोडु नको!ध्रु.

रडशी तर पडशील एकटा, आरोग्यही ना राहील
उपासना कर शक्ती साठव हो जीवा उद्यमशील
चैतन्यास्तव एक क्षण स्मर, तास तास घालवू नको!१

जो गेला त्या दोष न द्यावा कारण तो तर देवाचा
जन्ममरण का असे हातचे पराधीन नर नित्याचा
श्रद्धेचे त्या श्राद्ध म्हणावे, उगाच भपका करू नको!२

अचानक कधी रांगेमध्ये तुझाही नंबर लागेल
करायचे हे राहुन गेले म्हणून कष्टी होशील
करुनि भले हो नामनिराळा मी केले हा गर्व नको!३

देवालाही दोष न द्यावा कर्म जसे फळ लाभतसे
एकाचेही दुसऱ्या जीवा सोसायाला लागतसे
प्रसंगास तू हो सामोरा रणातुनी पळ काढु नको!४

जीवन म्हणजे एक लढाई हजार जखमा होणार
विव्हळ थोडा पुन्हा हो खडा वीर असशि तू झुंजार
अभिमन्यू झाशीची राणी प्रताप यांचा भुलू नको!५

मरणही शिकवी जगावयाला अनुभवास ये माणुसकी
शेजारी ही धावुनि येती अनोळखा ही बंधुच की
हरि स्मरण कर पुन्हा पुन्हा तू व्यसनी कसल्या गुंतु नको!६

सोसायाचे चुकत नसे तर हासत हासत सोसावे
दुर्दैवाला ठरवी दुर्बळ जीवनगाणे तू गावे
स्वरूप आनंदाचा स्वामी होशी तू शंकाच नको!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७.६.१९९९

Thursday, May 13, 2021

संसार म्हणजे परमार्थाची प्रयोगशाळा



परमार्थाची प्रयोगशाळा आहे संसार
आग्रह घडवी येथे वटवट शांत सदाचार!ध्रु.

वाणीतुन प्रकटते साधना का मग भांडावे?
अपशब्दांनी का कोणाच्या मनास दुखवावे?
सहन करी जो शिवानुयायी अंती ठरणार!१

कुणि न सांगता कामे सारी झटपट उरकावी
टापटीप ती तैशी आस्था जनां कळो यावी
घर हे मंदिर गमते जेथे अभंग म्हणणार!२

दुसऱ्याचे सुख ते माझे सुख अनुभवि हे जाणे
सात्त्विक आहाराची गोडी सत्त्वस्थच जाणे
गीताजीवन जगता यावे साधक बघणार!३

योगायोगे येथे जमलो पुढचे ना कळते
जे ते भेटे हरिरूप ते का न मना कळते?
नामी रंगे राम तयाचा शिक्षक होणार!४

नरनारी आबालवृद्ध ही सगळी श्रीराम
प्रत्येकच घर ठरे अयोध्या भाव जनी ठाम
आपुलकीचे रेशिमधागे शाली विणणार!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.६.१९९५

दिंडी सत्याची पुढे पुढे चालली..


दिंडी सत्याची पुढे पुढे चालली!ध्रु.

सत्य हाच देव येथे प्रेम देवघेव
बंधु एकमेकां देती भावभरे खेव
ज्योत ज्ञानाची अंतरि तेवली!१

स्वप्नी दिले राज्य झाला राजा वनवासी
प्राणमोल दिले पिता जागे वचनासी
स्थिती योग्याची अंतरि बाणली!२

धर्म नाही सोडणार छत्रपती बोले
जगू तर पुन्हा लढू पराक्रम बोले
मरणात ती अमरता जगली!३

न्यायाधीश सांगे खुना मृत्यु हाच दंड
सत्ता पडे सत्यापुढे हिमासम थंड
पापे लाजेने मान खाली घातली!४

जन्मसिद्ध हक्क राज्य हिंदवासियांचे
प्रगतिचे गाडे कोठे नाही अडायाचे
मने निर्धारे पुरी पुरी चेतली!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९८२

Friday, May 7, 2021

आवाहन श्रीनवनाथांना



भावभरे नमितो नवनाथा प्रभातसमयी अंतरि या
प्रणवाचा हुंकार ऐकवत अज्ञाना निरसाया या!ध्रु.

अश्रू झरती पुलकित काया सोsहं स्पंदन जाणवले
प्रसन्न रविराया ये उदया मन्मन नकळत मोहरले
अबोल बोली बोलविण्यासी प्रबोधनासी या हो या!१

नयनदले मी मिटूनि घेता हृदयकपाटे खुलताती
मौनातुनि संवाद स्फुरता धन्य धन्य होतात श्रुती
पाहिले न जरि, बोललो न जरि निजशिष्या कवळाया या!२

नवनाथा हो सादा आधी मी पडसादा परिसावे
मूर्ती आधी दिसता छाया चरणधूलि मज बनवावे
वियोग पळभर साहवे न मज करुणाघन हो वर्षत या!३

आदिनाथ तो तया वंदिता वाणी वेदवती होते
गीतातुनि घे आकृति गीता बावरते मन बावरते
कसे करू मी स्वागत आता कर जोडुनिया म्हणतो या!४

भस्म दिले ते चर्चुनि भाळी सदाशिवाचे स्मरण करू
रुद्राक्षाची माळ घालुनी मी शिव मी शिव घोष करू
जिवाशिवाचा योग साधण्या या नवनाथा सत्वर या!५

त्रिशूल करिचा शूला शमवी दक्षिण कर अभया देई
अर्धोन्मीलित नेत्र आपुले देती सोsहंची ग्वाही
विश्र्वनिकेतन हे नवनाथा विश्वात्मक मज करण्या या!६

देहाचे देहत्च निमाले अनुभव ऐसा येऊ दे
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी पूर्णत्वाने लोपू दे
अद्वय सुख भोगाया शिकवा श्रीरामा सुखवाया या!७

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६/१७.२.१९७७

करु या पूजन श्रीनवनाथांचे..

चला सयांनो, करु या पूजन श्रीनवनाथांचे!
पूजन करता उजळत तनमन भाग्य भाविकांचे!ध्रु. 

भक्तीमध्ये जरा न थारा असतो शंकेला
स्थलकालांच्या सीमा लंघुन साधक गेलेला
अंगी येते हत्तीचे बळ लढत राहण्याचे!१

सृष्टिचक्र गति चमत्कार हा मोठ्याहुन मोठा
काळ जखम करि, घाली फुंकर कठोर का म्हणता
महाकाल जो आदिनाथ त्या नमन करायाचे!२

वाचत जाऊ समजुन घेऊ हातातिल पोथी
समजुन घेऊ सांगत जाऊ नाथांच्या गोष्टी
पसाऱ्यातले सार तेवढे वेचुन घेण्याचे!३

फुले शुभ्र वसनेही शुभ्रच रहस्य जाणावे
प्राणांचेही मोल देउनी शीला रक्षावे
ध्याना बसता पळून जाते भय कलिकाळाचे!४

ललित कथांचे, गीतांचे वा रूप बघा देउन
संवादाची रुची आगळी नाट्य बघा लिहुन
सुधासागरी आनंदाने तरत राहायाचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९.४.२००१
वरुथिनी एकादशी

Thursday, May 6, 2021

रामकृष्ण गा मना



राम राम राम राम राम राम गा मना
कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण गा मना
राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण गा मना!ध्रु.

राम अंतरातला तोच नाम घेववी
कृष्ण हा करातला तोच कार्य साधवी
धैर्य ठाम बाळगी सचेतना मना मना!१

देहदुःख सोसणे तप न या विना दुजे
गात गीत हासणे जप असेच जाणिजे
अर्थ जीवनातला शोध शोध रे मना!२

अनादि तू अनंत तू पुन्हा पुन्हा बजावतो
तूच पार्थ कृष्ण तू तुझे तुलाच सांगतो
ज्ञानदेव नामदेव तूच रे पहा खुणा!३

रडू नको झुरू नको खचू नको मना कधी
संधि साध नेमकी सापडे कधी मधी
सावधान सावधान सावधान हो मना!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.६.२०००

Monday, May 3, 2021

उमाधवा हे सदाशिवा..

या देही या जन्मी जाणव नित्य प्रभाती जिवा शिवा
उमाधवा हे सदाशिवा!ध्रु.

शिव शिव म्हणता मन शिव होई
मन शिव तनु रोमांचित होई
शीतल गंधित वायुलहर गारवा गोडवा तिचा हवा

सत्य नि सुंदर ते शिव असते
त्यांचे चिंतन उपकारक ते
श्रवण नि कीर्तन स्मरण शिवाचे व्हावे हा तर ध्यास जिवा

थोडे तरी उतरावे लागे
मनहि न बघते वळून मागे
तुझी पिंड दिसताक्षणि नयना सदानंद लाभला जिवा

धवल फुले ती गंध चंदनी
धवल चंद्रिका प्रकाशे मनी
अभिषेकाची ही जलधारा देत गारवा तप्त जिवा

हे गंगाधर हे फणिवरधर
हे शशिशेखर हे गिरिजावर
ज्ञानज्योती पिंडच गमते शिवभक्ता आलोक हवा

सृजन नि विकसन तसे विसर्जन
तिन्ही अवस्थांचे अवलोकन
तूच करविशी आदिनाथ हे वंदनीय श्रीगुरुदेवा

तू मृत्युंजय हरवि मरणभय
रहस्य उकलुन फेडी संशय
नाथसंप्रदायी जो झाला त्या पाठी तू असशि शिवा

शिव हर शंभो महादेव तू
गणनाथाचा वंद्य पिता तू
तव प्रिय गिरिजा प्रथमा शिष्या नमन तुला रे सदाशिवा

सुरसेनानी जन्मा येवो
असुरांचे साम्राज्य संपवो
या हेतूने नियती जोडी गिरितनयेशी तुझा दुवा

अप्रिय दाहक गिळता यावे
वाण सतीचे मज पेलावे
युक्तीसह दे शक्ति आणखी नकोच काही उमाधवा

श्र्वासावरती पूर्ण नियंत्रण
प्रसन्न मन अन् सुस्थिर आसन
अभ्यासा रामास बसवुनी स्वरूपदर्शन घडव शिवा

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२.२.१९९६

Saturday, May 1, 2021

आईबाप हे दैवत माझे



माझे बाबा विठ्ठल
आई रखुमाई!ध्रु.

रोज सकाळी तया वंदितो
डोळे भरुनी दर्शन घेतो 
पूजा ही होई! १

शुभं करोति म्हणता म्हणता
पाठांतर हो बघता बघता
गानी रस घेई!२

बहीण माझी जवळी येते
मांडीवरती आपण बसते
मी मोठा होई! ३

भांडण होते लगेच मिटते
कधी ऊन कधी सर कोसळते
श्रावण मी पाही! ४

मनात येते घरच पंढरी
बुडवावे ते आपण गजरी
वारकरी होई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

वसंत व्याख्यान माला

प्रबोधाय प्रमोदाय
प्रवृत्तोऽयमुपक्रम: ।
पुण्यपत्तनवैशिष्ट्यं
ज्ञानसत्रं पुरातनम् ।।

अर्थ : 
नागरिकांना ज्ञान लाभावे, त्यांचे मनोरंजनही व्हावे म्हणून वसंत व्याख्यान माला हा न्या. म.गो.रानडे यांनी सुरू केलेला उपक्रम पुण्यनगरीचे आगळे वैशिष्ट्यच आहे.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, April 27, 2021

हनुमंता हो बलवंता..


हनुमंता हो बलवंता
बलवंता हो धीमंता!ध्रु. 

आम्ही वीरगडी
स्मरु घडी घडी
मार्ग दाखवा हनुमंता!१

भक्ताग्रणी तुम्ही
रमला रामी
शक्तियुक्ति द्या श्रीमंता!२

बळ मिळवू हो
गुण मिळवू हो
वर द्यावा हो हनुमंता!३

रघुनाथ विभु
तो एक प्रभु
वंदन घ्या हो पवनसुता!४

घर असो नसो
मनि राम वसो
दास्यभाव द्या हनुमंता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(रामदास स्वामींच्या चरित्रावर आधारित काव्यातील एक काव्य)

शिष्य गेला पुढे


शिवरायांनी देह ठेवल्‍याचे कळले आणि समर्थ उदास उदास झाले.  पैलतीर त्‍यांनाही दिसू लागले.  काय खंत होती त्‍यांच्‍या मनामधली.


गुरूस सोडुन अर्ध्यावरती
शिष्य गेला पुढे!ध्रु.

सूर्य उगवता मावळणारा
क्षणभंगुर तर जगी पसारा
कीर्तिध्वज परि शिवरायाचा
वरती वरती चढे!१

श्रींची इच्छा उपाय नाही
शोक आवरी चित्ता पाही
जगी जगावे कवणासाठी
हेच पडे साकडे!२

ऐसा भूपति होणे नाही
दिसणे नाही, श्रवणे नाही
"वाढवि राजा" असे प्रार्थिता 
ऐसे कैसे घडे?३

उपदेशाते कोण आचरिल?
पराक्रमे राज्यास वाढविल
अस्ताचलि रवि निघता का
ही किरणशलाका अडे?४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, April 21, 2021

पाळणा घरामधे हाले..

श्रीरामाच्‍या जन्‍मतिथीला कौतुक अवतरले
राम जन्‍मला मंदिरात अन भक्‍त घरा आले
पाळणा घरामधे हाले! ध्रु.
 
श्रीरामाचा जयजयकार
दुमदुमला सारा प्राकार
भक्तिभावना हर्षभराने स्‍वैर उधळते फुले! १
 
सूर्यदेव हा प्रसन्‍न झाला
अपुल्‍या भक्‍ता प्रसाद दिधला
कृतज्ञतेने नारायण हे नाम मुला लाभले! २
 
टाळ घुळघुळे मृदंग घुमतो
अश्रू नयनी गळा दाटतो
आंदुळता मंदिरि रामालामाय मुला आंदुळे! ३
 
कृतार्थ झाली राणूबाई
कृतार्थ माता धन्‍य पिताही
दोन बालके घरी रांगता गोकुळ घर गमले! ४
 
प्रभुसेवा ही फळास आली
उपासना परि सतत चालली
नारायण बाळाते बघता धाम स्‍वर्ग जाहले! ५
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, April 14, 2021

प्रार्थना



श्रीरामा कर करुणा दासाला धाव पाव लवलाही
नाम सदाचे कंठी राहो ऐसे सुखे करी आई !१

श्रीरामा दे श्रद्धा कर्तव्याचे असो सदा भान
सहकार मंत्र मोठा, बाणो अंगी असेच दे ज्ञान!२

श्रीरामा तुज शरण आलो द्यावी पदी मला जागा
आशीर्वच दे इतका एकत्वाचा तुटेल ना धागा!३

श्रीरामा दे अभया संशय सगळा विरोनिया जावा
मी नच शत्रु कुणाचा ओलावा तू मनात आणावा!४

श्रीरामा तू वचने करुणेची या मुखातुनी वदवी
ज्यातुन मिळे दिलासा ऐसे काही कराकडुन लिहवी!५

श्रीरामा कर किमया ओघे येई करात जे काम
एक अपूर्व सुसंधी दर्शन देवो तिच्यातुनी राम!६

श्रीरामा तुज स्मरता घालव सारी विवंचना माझी
तू नित माझ्यापाशी सांभाळाया प्रभो रहा राजी!७

श्रीरामा दे प्रेमा बसवी नेमे मनास ध्यानाला
विनवी हेच दयाळा जागव जागव असाच जिव्हाळा!८

श्रीरामा दे दृष्टी बघण्या सृष्टी तुझ्यात रमलेली
येवो निशिदिनि कानी माझ्या सुरेल हरिमुरली!९

श्रीरामा तव मुद्रा सुभगा हसरी तशीच दे मजला
समता शांति मनाची न ढळे, न ढळे असे करी मजला!१०

श्रीरामा तव चरिता आळविता हो मनास आल्हाद
रमवी रामकथा जी अनुपम आहे तिचाच आस्वाद!११

श्रीरामा धर हाता चालव चालव सवेच तू मजला
असशी पुढती मागे अंतरि ऐसे कळो  वळो मजला!१२

श्रीरामा चैतन्या आत्मारामा इथे तिथे पाहू
घेता नाम तुझे, सुख मुक्तीचे पदोपदी लाहू!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, April 11, 2021

गीतापंचामृत

 
पुन्हा पुन्हा वाचावी गीता
ती सोपी होते
भक्ति मिसळली कर्मामध्ये
द्वैत लया जाते!१

योगेश्वर हृदयात राहतो
रथास चालवितो
क्षणाक्षणाला पार्थच लढतो
धर्मराज्य आणतो!२

ओघे आले कर्म करावे
वेगळा न धर्म
कृष्णच  कर्ता कृष्ण करविता
ही बैठक ठाम!३

लेपच नाही पाप कोठले
मन हलके झाले
गीता गाता गाता गंगा
धन्य धन्य वाटले!४

घरोघरी पोचावी गीता
हा घ्यावा ध्यास
आधि व्याधी निघून गेल्या
प्रत्यय हमखास!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०८.२००४

Sunday, April 4, 2021

रामदास धन्य तो....

रामदास धन्य तो!
रामदास धन्य तो! ध्रु.

सत्यशोध ध्यास हा
अन्य ना जया स्पृहा
रामनाम गर्जतो ! १

देश एक देव हो
दास्यभाव धर्म हो
दक्ष नित्य राहतो ! २

शुद्ध प्रेम अंतरी
कीर्ति ही दिगंतरी
कृतीत तत्त्व आणतो ! ३

आत्मतृप्त हा सदा
भक्तियुक्त हा सदा
जनात राम पाहतो ! ४

देहभाव लोपला
आत्मभाव जागला
विनम्र भाव शोभतो ! ५

दंभ ना शिवे जया
लोभ ना शिवे जया
शीलचंद्र हासतो ! ६

सुभाष हा सुधीर हा
सुशांत हा सुकांत हा
रामभक्त धन्य तो ! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.९.१९७९

मनास उजळा हो ..

सज्जनगडचे रामदास गुरु
मनास उजळा हो! ध्रु 

मना थोपटा
धरवा नेटा
द्या पदि थारा हो ! १

नामी रमवा 
राम भेटवा
विषया विटवा हो ! २

मन हे मंदिर
आत्मा ईश्वर 
दर्शन घडवा हो ! ३

देह नसे मी!
तो मी! तो मी!
पूर्ण बिंबवा हो ! ४

मनपण विरु दे
राम कळू दे
आत्मबोध द्या हो ! ५

ओळख पटु दे
दुजे न दिसु दे
मुळास भिडवा हो ! ६

यत्ना द्या बळ
बनवा निर्मळ
सन्मार्गी न्या हो ! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.९.१९७८

Friday, April 2, 2021

एकोबा ठरला विजयी वीर निमिषात..

जनार्दन स्वामी ध्यानात दंग झाले होते. एवढ्यात देवगिरीच्या किल्ल्यावर शत्रूकडून जोरदार हल्ला झाला. तेव्हा एकनाथांनी मोठ्या शौर्याने ते आक्रमण मोडून काढले व अत्यंत निरहंकारीपणाने गुरुसेवा केली.
त्या शौर्याची ही गाथा
---------------------------------------------------------------------


परचक्र पातले अवचित किल्ल्यावरती
गुरु मग्न तेधवा समाधीमधी असती
डगमगला नाही परि सिंहाचा छावा
त्यापुढे क्षुद्र हो वनहत्ती मेळावा...
हातात घेउनी खड्ग लढे जोसात
एकोबा ठरला विजयी वीर निमिषात!

अवसान केवढे, झेप तयाची मोठी
संहारक शस्त्रे निष्प्रभ ठरली पुढती
गुरुकार्य करावे हेच बालका ठावे
निज पराक्रमाने गानिमांते निपटावे
क्षात्रत्च उतरले कुठून अंगागात..
एकोबा ठरला विजयी वीर निमिषात!

ही स्फूर्ति लाभली गुरूपासुनी मजला
पुण्येच तयाच्या कुणि न वधाया धजला
चैतन्य ईश्वरी सकलांते नाचविते
इच्छेविण त्याच्या पान मुळी ना हलते
नम्रता शोभावी नरा गुणाधिक्यात..
एकोबा ठरला विजयी वीर निमिषात!

जे आपण केले गर्व न त्याचा मिरवी
गुरुस्नेह-पताका निष्ठेने तो उभवी 
ही अनासक्ति लाजवी खचित कमलाला
गुरुभक्ति तोषवी हृदयीच्या श्रीहरिला
ऐसा न लाभणे शिष्य लाख शिष्यात...
एकोबा ठरला अद्वितीय निमिषात!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
ऑक्टोबर १९७२
केरवा (चाल पोवाड्याची)

नाथ जरी निघुनी गेला..

एक थोर प्रापंचिक संत एकनाथ!
त्यांची कीर्तने, प्रवचने, निरूपण यांनी त्यांची कीर्ती वाढत राहिली. लोकांना सुलभ रीतीने परमार्थाचा बोध ते देत राहिले.
शके १५२१ फाल्गुन वद्य ६ नाथांनी समाधी घेतली.
भक्त गहिवरून म्हणतात - 

नाथ जरी निघुनी गेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेला
कीर्ति राहिली! अपुली कीर्ति राहिली!

दिनांचे नाथ
अनाथांचे तात
विश्र्वमय झाला आपण नाथ माउली!

सर्वदा संतुष्ट
विषयी विरक्त
गोरगरीबांवर धरली स्नेह सावली!

गोदेचे लेकरू
प्रेम अनिवारू
गोदाई गातच गाणी मंद चालली!

प्रभो एकनाथा
संत एकनाथा
दयासिंधु गौरव गाथा जनी रंगली!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
ऑक्टोबर १९७२

Wednesday, March 31, 2021

रायगडा जाऊ!


शिवाजी उत्सव हा दुसरा राष्ट्रीय उत्सव टिळकांनी सुरु करून दिला.  तो केवळ रायगडावरच न राहता खेडोपाडी पसरला. त्यातून असंख्यांना स्फूर्ती मिळाली.  आत्मविश्वास निर्माण झाला. भारतीयांच्या माना अभिमानाने ताठ झाल्या!
-----------------------------------------
रायगडा जाऊ, स्मृतींनी धन्य धन्य होऊ!
शिवभूपा ध्याऊ, शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

या भूमीवर स्वराज्य होते
कर्तृत्वाचे पुण्यस्थल ते
दे स्फूर्ती दे भवानी माते!
दिशा दिशा घुमवू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

समाधीवरी हवीच छत्री
चैतन्याची ही गंगोत्री
अवघे जण तीर्थाचे यात्री
गत वैभव मिळवू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

तन मोहरले, मन गहिवरले
रायगडाला हासू फुटले
स्वप्न दिव्य नेत्रांत तरळले
या नेत्री पाहू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

जळी - स्थळी - काष्ठी - पाषाणी
जय स्वराज्य, जय शिव ही वाणी
पुन्हा रंगले शाहिर कवनी
चैतन्ये न्हाऊ - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

उत्सवात या व्यापक दृष्टी
जाति-पंथ जन भुलुनी जाती
स्वराज्य संपादनास स्फूर्ती
येथुनीच घेऊ - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

वाटे जणु शिवकाल पातला
रोम रोम तनि फुलुनी आला
मनगटातला जोर वाढला
पूर्व दिव्य जर, दिव्य अनागत सामर्थ्ये निर्मू
शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.२.१९६८

Wednesday, March 17, 2021

मना नाम जप तेच खरे


ॐ राम कृष्ण हरि जप कर रे
मना नाम जप तेच खरे!ध्रु.

अडू नको रे कुढू नको रे होई रे मोकळा
जीवपणाचे बंधन सुटले छान लागु दे गळा
जे जप करती भगवंताची आवडती लेकरे!१

ॐकाराने प्राणवायु घे भरून तू आत
स्वामींनी बघ हलके धरला स्वये तुझा हात
राम रमवितो, कृष्ण खेचतो, आतुन उमजे रे!२

दुःख नि चिंता मरणभयाचे धुके ओसरेल
तू स्वरूप आनंद तूच रे ध्यानी येईल
अभ्यासाचा मार्ग सुकर तुज सदगुरु करती रे!३

उचलुन पाउल पावसला चल पावस पंढरपूर
वारकरी तू वीणा हाती नयनी अश्रूपूर
भाग्यवंत तू तुझ्यासारखा हो गुरुदास त्वरे!४

श्रीहरि हरतो अज्ञानाला शांत करी काहूर
शांति रहाया ये माहेरा बदले सारा नूर
नामरसायन करि श्रीरामा खचित निरामय रे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.७.२००१



Monday, March 8, 2021

धन्य धन्य हिरकणी

रायगडावर दूध घालायला हिरा गवळण यायची. हिरकणी तिचं नाव. आपल्या लेकराला पाळण्यात ठेवून लगबगीनं वर दूध घालून ती परतणार होती.  

एवढ्यात ती गडावर असतानाच तोफेचे आवाज झाले. गडावरचे दरवाजे बंद झाले. ती भयाभया हिंडली. 

आणि सापडली एक बिकट वाट सापडली.  अत्यंत उतरणीची वाट! तिची पावलं झपाझप पडू लागली. काटेकुटे, कडेकपाऱ्या यांना न जुमानता ती घरी पोहोचली. 

दुसऱ्या दिवशी तिला महाराजांपुढे गडावर आणून हजर करण्यात आले. 
तिच्या धैर्याबद्दल महाराजांनी त्या माउलीचा गौरव केला. 

--------------------------------

तान्हे राहियले घरी जरी आल्ये गडावरी
माजे काहूर मनात ऊर धडकते भारी।।

अशा कातरवेळेला कटी दुधाची कासंडी 
बाळ दुधावाचुनीया आक्रंदुनी विश्व कोंडी

झाले तोफांचे आवाज दारे झाली मला बंद
मन माझे हो बेबंद तया तान्हुल्याचा छंद

शिवा मी रे माय त्याची आण तुला माउलीची
जळाविना तडफड  होते कैसी मासोळीची

गेल्ये कशीही घरासी कोणी आडवू धजेना
माझ्या वाहत्या पान्ह्याला कशी रोखू आकळेना

माझ्या घराच्या वाटेला झाले काटेकुटे फुले
किती अवघड कडे माझ्यासाठी झाले झोले

देव माझा पाठीराखा तया घातली मी आण
भेट घडली पिलाशी नुरे सुखलागी वाण

शिवा देई सजा काही नसे मला त्याची तमा
परी माऊली होऊनी करीन मी तुला क्षमा

वच ऐकुनी मातेचे मुखी बोल उमटेना
शिवा पाय धरी तिचे तिज मिळे दुजा तान्हा

आज कलीयुगामाजी झाली अमर कहाणी
धन्य धन्य बाळ तीचे, धन्य धन्य हिरकणी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, February 27, 2021

मायबोली मराठी ज्ञानदेवांसाठी भूपाळी म्हणते आहे

मराठी मायबोली! साध्या सरळ स्वभावाची - निर्मळ मनाची! ज्ञानदेव - तिचं लाडकं लेकरू.  बाळाला कोण अभिमान आपल्या माऊलीचा! बाळाचं वय लहान, पण कार्य महान! त्यानं 'म्हराटिचिये नगरी' ब्रह्मविद्येचा सुकाळु केला. अलंकारांचा साज चढवला. आईला श्रीमंत केलं! 
माता या गुणी बालकाविषयी कृतज्ञ आहे. तिचे डोळे पाण्याने भरले आहेत. कंठ दाटला आहे. जीवघेणी आर्तता उरात कोंडली आहे - तिला लागला आहे ध्यास - मांगल्याचा, भावनांच्या कोवळीकेचा, कैवल्याचा, सोलीव सुखाचा! म्हणून तर ती साद घालते आहे आपल्या लेकरास. बांधते आहे त्याची पूजा.  गाते आहे भूपाळी. जिच्यात आहे केवळ कृतज्ञता, केवळ सद्भाव, केवळ गुणांचे नम्र पूजन
************

माय मराठी साद घालते ऊठ ज्ञानराजा!
ऊठ! ऊठ राजा! ध्रु.

तू सुखलहरी ज्ञानाबाई
भक्ती जडली तुझिया पायी
मायबोलि मी आनंदाने करित बालपूजा!१

तूच अर्पिली अमित भूषणे
तूच कोरले शिल्प देखणे
ज्ञानदेवि मळवट भालीचा भरलासी राजा!२

अरूप बोली तू दाखविले
नादवीत शब्दांचे वाळे
माझ्या नगरी पुन्हा एकदा दुडुदुडु ये राजा!३

ज्ञानज्योत लावली तेवली
लक्षजनांचे अंतर उजळी
दीपकळी ही अक्षय तेवो हाच भाव माझा!४

जगावेगळे घडले काही
तू मातांची होसी आई
कृतार्थ माता हट्ट धरतसे, पुरव पुरव राजा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९७१
देसकार - केरवा

Friday, February 19, 2021

ऐसे स्वराज्य व्हावे!

जणु रामराज्य दुसरे, ऐसे स्वराज्य व्हावे!
ऐसे स्वराज्य व्हावे! ध्रु.

कर्तव्यदक्ष राजा, ती राजनिष्ठ जनता
जर पितृतुल्य राजा, त्याची असीम ममता
राजा प्रजाजनांचे नाते असे जुळावे! १

हे राज्य स्वावलंबी, व्हावे पुरे समर्थ
हे शस्त्रसज्ज होवो, मग चिंतिणे किमर्थ
घरदार, शेतीभाती, निश्चिंत सर्व व्हावे!२

रग नित्य वाढवावी, अभिमान वाढवावा
प्रोत्साहनास द्यावे, झेंडा नभी डुलावा
संरक्षणा समर्थ त्यानेच सूत्र घ्यावे!३

हा राज्यभार वाहे विश्वस्त तो प्रजेचा
राजा म्हणून म्हणवे तो दास या प्रजेचा
करि वाण हे सतीचे त्याचे तया कळावे!४

खंबीरता जयाची इतरास धैर्य देते
ती चेतना जयाची इतरांस वेग देते
ते राज्य सर्व घटका आनंदधाम व्हावे!५

नांदो समर्थ शांती म्हणूनीच युद्धसिद्ध
होवो न मानहानी म्हणूनीच नित्य सिद्ध
जगि माय तात राजा ऐसे प्रतीत व्हावे!६

नित हाल, नाश, कष्ट रुचती कसे प्रजेला
ते स्थैर्य धैर्य लाभो जो तो असे भुकेला
कथिता न एक शब्द त्याला पुरे कळावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

उष:काल जाहला!



वाजे सनई, झडे चौघडा, सह्याचल हासला
शिवनेरीवर आज खरोखरउष:काल जाहला!
उषःकाल जाहला!ध्रु. 

पूर्वा रंगे, वात सुगंधित, विहंग झेपावले
बालरवीच्या स्वागतार्थ सुर पूर्वेला पातले
उमले आशा नुरे निराशा, उच्च स्वर लागला!१

नद्या नि वारे, अग्नी तारे सारे आनंदती
दिन सोन्याचा का रत्नांचा, शब्द थिटे पडती
युगायुगांनी असा सुखद क्षण नियतीला गवसला!२

शुभ संवत्सर, शिव संवत्सर शुक्ल नाव साजले
आज गडाचे तोंड साखरेहुनी गोड झाले
बारा वाटा खळाळणारा जलौघही गर्जला!३

भाग्य उदेले पृथ्वीचे या कुमार जन्मामुळे
दिग्विजयी सुत वदे कुंडली ग्रह हर्षे डोलले
विघ्नेशाचा आशीर्वचना कर ही उंचावला!४

रामजन्म अन् कृष्णजन्म ही सुदिनी या वाटले
या बाळाच्या मुठीत इवल्या भाग्य सुखद हासले
वेदमूर्ती आशीर्वच देती - काल क्षण थांबला!५

चिमणा तान्हा जमविल सेना स्वप्न माय पाही
मुखचंद्रावर त्या बाळाच्या दृष्टी स्थिर राही
भाग्यलेख जणु बालललाटी विधिनेही लिहिला!६

आज पावली देवि शिवाई, कृपा थोर झाली
जगदंबेने निजकन्येची आस पूर्ण केली
करी घेउनी जीव सानुला पुनःपुन्हा चुंबिला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

उगवले युग हे शौर्याचे!


उगवले युग हे शौर्याचे! उगवले युगच विक्रमाचे!

किल्ल्यांमागुनि किल्ले घ्यावे
झेंडे गगनी उंच डुलावे
जयघोषे अंबर कोंदावे
बाहु स्फुरण्याचे! उगवले युगच विक्रमाचे!

वृद्धांअंगी यौवन आले
बोरूंचे क्षणि भाले झाले
द्विजांतरी क्षात्रत्व प्रकटले
वेड लढायाचे! उगवले युगच विक्रमाचे!

टिपरी नौबतिवरती पडली
झुंज वादळी सुरू जाहली
रणी जयश्री प्रसन्न झाली
भान न देहांचे! उगवले युगच विक्रमाचे!

विजयीवार्ता दौडत सुटल्या
आक्रमणाच्या वाटा अडल्या
समशेरी गनिमांवर पडल्या
भाग्य स्वराज्याचे! उगवले युगच विक्रमाचे!

रंग ध्वजाचा अपुल्या भगवा
त्यागाचाही रंगच भगवा
त्यागदेव त्यागे पूजावा
ठाउक नित्याचे! उगवले युगच विक्रमाचे!

वीरांच्या त्या रक्तामधुनी
पतिव्रतांच्या कुंकवातुनी
अग्नीच्या त्या ज्वालांमधुनी
स्फुरले गायन विजयाचे! उगवले युगच विक्रमाचे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले