गुरो हेच प्रार्थित अपणा, साधनात ठेवा!
साधनात ठेवा मजसी साधनात ठेवा! ध्रु.
साधनात ठेवा मजसी साधनात ठेवा! ध्रु.
चरणि नम्र झालो
शरण शरण आलो
उपासना दृढ चालाया हवी शक्ति देवा!१
सर्व काहि अपुल्या हाती
सर्व तीर्थे येथे वसती
नको विकल्प, संकल्प दृढ भाव द्यावा!२
तुम्ही संत कृपावंत
मृत्युलोकि भगवंत
परब्रह्म अपुल्या ठायि नित्य दिसो देवा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९३ (११ जुलै) वर आधारित काव्य.
प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे. त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात, त्यात सत्पुरुष होता होईल तो ढवळाढवळ करीत नाहीत. परमार्थाच्या बाबतीत मात्र त्याची सर्व सत्ता असते, आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधना बद्दल शंका घेणे, दुसरे मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे, आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच व परमार्थ ही दोन्ही कामे त्यांच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे. संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही कारण त्यांचा देह आमचे काम करीतच नाही तो परमात्मस्वरूप आहे ही जी आपली भावना, ती आपले काम करते. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो, म्हणून सत्पुरुष हा देहानी या जगात राहतो असे दिसले तरी, अंतर्यामी तो भगवंतापाशीच बसतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातील वस्तूंविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. त्यांना ओळखायला आपल्या अंगी थोडे भगवंताचे प्रेम असणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment