Saturday, July 11, 2026

विठ्ठल रुक्मिणी मायतात वारसा देत हरिभक्तिचा..

निवृत्तीने ज्ञान होतसे सोपान लाभे मुक्तीचा 
विठ्ठल रुक्मिणी मायतात वारसा देत हरिभक्तिचा!ध्रु.

भलेबुरे श्रीहरि जाणता कर्तव्याला करायचे 
कृष्णच कर्ता कृष्ण करविता अभ्यासाने ठसायचे 
गीता जगता होते सोपी सांगावा श्रीपार्थाचा!१ 

महिषमुखाने वेदमंत्र ये बोलविता धनी विठ्ठल हो
संकेताने भिंत चालली चालविणारी रुक्मिणी हो
कृतज्ञतेने तनी नम्रता अमोल ठेवा जपायचा!२ 

हरिपाठाची संगत लागे रंगत जाते जीवन हो 
हरि हरि म्हणता सूर्यप्र‌काशे तिमिर लयाला जाते हो
अमृतानुभव भाविक घेई साधक ऐसा भाग्याचा!३  

कंटकमय पथ तरी चाल‌णे ध्यास धरावा ध्येयाचा 
सहन करावे हसत जगावे धर्म शुद्ध आचाराचा 
माणुसकीने वाग माणसा सुबोध ऐसा संतांचा!४ 

परमार्थाचा पंच‌प्राण हा इथे तिथे श्रीभगवंत 
दात आपुले ओठ आपुले अपमानाची का खंत
अंतःस्थाला स्मरता होतो नारायण नर नित्याचा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३/४/१९८५

No comments:

Post a Comment