Sunday, July 12, 2026

जीवन अवघे गुरूस देता,- उरते केवळ आज्ञापालन!

जीवन अवघे गुरूस देता,-
उरते केवळ आज्ञापालन!ध्रु.

व्यवहारी जरि नच गुंतावे
व्यवहारासी नच सोडावे
अलिप्ततेने घडो आचरण!१

हवे हवे से नच वाटावे 
भजन पूजनी रंगुनि जावे 
हळू गळू दे सकल अहंपण!२

साधन जे सद्‌गुरूने दिधले 
निष्ठापूर्वक जर आचरिले 
सार्थकि लागे सगळे जीवन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९४ (१२ जुलै) वर आधारित काव्य.

ज्या दानाची आठवण राहत नाही ते दान खरे होय. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे वाटले नाही पाहिजे. आपण कृती करतो, पूज्य भाव वगैरे ठेवतो परंतु सद्गुरूंनी सांगितलेले तेवढे करत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता, उलट अहंपणा वाढवण्यासच मदत करतात. आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूंच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. आपण व्यवहारात गुंतू नये पण व्यवहाराला सोडूही नये. ज्याने जगाची आस टाकली, त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. भगवंताची गरज सद्गुरु त्याचे नाम देऊन भागवितात. नामात अखंड राहिल्यास परमार्थ साधतो. प्रपंचात समाधान मिळते आणि जन्मास आल्याचे सार्थक होते.

No comments:

Post a Comment