काय असे परमार्थ? आज्ञा सद्गुरूची!ध्रु.
शरण तयासी गेल्यावरती-
नाम निरविती अपुल्या हाती
गुरुकिल्ली तीची!१
समाधान हो अपुले जेथे
गुरुपद तेथे खचितच असते
पर्वणि लाभाची!२
वृत्ती देवाकडे लाविती
अनुसंधानी सदा ठेविती
कृपा माऊलीची!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन १९६, १४ जुलै वर आधारित काव्य)
परमार्थाचे जर काही वर्म असेल तर आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय. गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाव आपण घेत असावे. गुरु कोणाला करावे? जेथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते. तुमचे जेथे समाधान झाले त्यांना गुरु समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्यास पहा. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली आहे याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे.
No comments:
Post a Comment