गीता - भगवंतांनी गाइलेली सुमधुर गीता! अमृतमय गीता! स्फूर्तिदायिनी गीता! पुरुषार्थबोधिनी गीता! अवघे ७०० श्लोक पण संजीवनीने भरलेले - भाविकांना पुरतेपणी भारून टाकणारे.
अशी ही गीता आपल्या सगळ्यांचीच माता, वात्सल्याचा सागर, विचारांचा रत्नाकर. तिच्या चिंतनाने मनाला स्नान घडते विवेकाचे पोषण घडते अशी सुसंस्कार घडवणारी गीता, संत ज्ञानेश्वरांनी मराठीत आणली - 'इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ' केला.
गीता आणखी सोपी केली आचार्य विनोबांनी! तीच गीता छोट्या छोट्या गीतांतून आणता आली तर - गाताही आली तर..
श्रोतेहो - आपण संतांनी मला पावन करून घ्यावे, सुरात सूर मिसळून द्यावा - अमृतसागर उचंबळावा हीच प्रार्थना! हीच चरणी विनवणी!
-------------------------------------
मधुरागांनी मंजुस्वरांनी
गाऊ पूजू कल्पसुमांनी
अमर अमर ती गीतावाणी!ध्रु.
अनंत आत्मा काया भंगुर
देहभावना विसरुनि सत्वर
प्रभू तोषवू कर्मफुलांनी!१
काय करावे जधी कळेना
विकल्प उठती मनात नाना
सहाय्य गीता होत तत्क्षणी!२
लोकसंग्रहा देत प्रेरणा
अंगांगी निर्मिते चेतना
तत्पर ठेवी तत्त्वपालनी!३
तोल मनाचा नित सांभाळी
सदा कृपेची पाखर घाली
वात्सल्याचा सागर जननी!४
युगे लोटली उभी तरीही
ज्ञानदीप तो तेवत राही
तीच सुकाणू नौकानयनी!५
अमर अमर ती गीतावाणी!
गीत गीता
कवि : श्रीराम आठवले
No comments:
Post a Comment