यौवनी या राष्ट्रकार्या वाहतो सर्वस्व मी!
मातृभूला मी नमी! ध्रु.
देश माता, देश गुरु हो, देशसेवा साधना
देशभक्ती ईशभक्ती तीस दुसरा अर्थ ना
कर्मयोगी कार्यकर्ता नम्र सेवक होत मी! १
लोकमान्यी देव दिसला मोहनांतरि मोहन
हे महर्षी धन्यता ही सजल करिते लोचन
भाव माझा थोर ठेवा जीवनांती जपिन मी! २
जे स्वदेशी तेच रुचते तेच देई चेतना
जे विदेशी ते न रुचते वासनेसी वाव ना
देह लागो देशकार्यी प्रार्थितो देवास मी! ३
छात्र मजसी देव झाले बोध ऐसा द्यायचा
रंगता त्यांच्या सवे दंग आत्मा व्हायचा
ग्राम आश्रम होउ दे याचसाठी झटिन मी! ४
बाल्य माझे शोधताहे हासते जे भोवती
दिव्य गंधा हुंगताहे अंतरी जो संप्रती
सूर माझा सहज गवसे संगिती या धुंद मी! ५
शुद्ध हेतू यत्न सेतू पोचणे दुसऱ्या तिरी
मीच मजला पुढति नेणे ठाउके मजला परी
आत्मश्रद्धा सद्गुरुसी सर्वभावे प्रार्थि मी! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(पावसच्या स्वामी स्वरुपानंदांच्या चरित्रावर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment