Sunday, October 9, 2022

गीता गाता येते



गीता गाता येते गाता गाता कळते!ध्रु.

जीवन ही रणभूमी आहे येथे लढणे अटळच आहे 
प्रहार करणे तसे झेलणे हरिस्मरण तर श्वसनच आहे 
जे जे कळले, वळते!१ 

सरळ मनाचा अर्जुन व्हावे, कृष्णाला सारथी करावे 
असा सद्गुरु नाही दुसरा तने मने श्रीहरिचा व्हावे 
सत्कृति पूजन घडते!२ 

पाचही प्राणांचा या पावा, आपआपला श्रवण करावा 
नित जावे प्रेमाच्या गावा, का बाळगणे कुणी दुरावा 
साक्षीपण हितकर ते!३ 

गीताभ्यासी ये ओळखता कसा हासरा कसा खेळता 
सुमन मनाचे बघता बघता हरिचरणी राहणे योग्यता 
अतूट असते नाते!४ 

खचायचे ना कधी मनाने, झेपावे गगनी विहगाने 
तन हो बळकट व्यायामाने नरनारायण सोऽहंध्याने 
कृष्ण, कृष्ण म्हण नुसते!५
 
कर्मफलाची आशा नाही सुखदुःखांचा स्पर्शच नाही 
गुणातीत हा होऊन जाई असून जगती जगात नाही 
कोडे अलगद सुटते!६ 

अवघ्या आशा श्रीकृष्णार्पण श्रीहरि कर्ता समजुन उमजुन 
हलके फुलके झाले तनमन, श्रीगीतेचे हे पारायण
फला सुफलता मिळते!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०५.२००४

No comments:

Post a Comment