दीनजनांची गुरुमाउली पावसेत वसली
कृपामृताची करुणा तिचिया रूपे साकारली! ध्रु.
कृपामृताची करुणा तिचिया रूपे साकारली! ध्रु.
ती शांतविते मनिची तळमळ
मोदझरा वाहविते झुळझुळ
शीतल गंधित वायुलहरिने तनु पुलकित झाली! १
दर्शन शुभकर मनास सुखकर
मनी जागवी श्रीशिवशंकर
साद शिवाची हिचिया स्पर्शे जीवकानि आली! २
भगवद्भक्ती जनां शिकविते
वळण प्रवाहा योग्य लाविते
भागीरथि जणु हिचिया रूपे नगरातुनि वाहिली! ३
ओघवती तशि रसाळ वाणी
साहित्याच्या सुवर्णखाणी
ही शब्दश्री ही अनुभवश्री आनंदे प्रकटली! ४
सोऽहं भावचि हा तनुधारी
भक्तजनांचा हा कैवारी
कलियुगातही अतर्क्य घटना पावसेत घडली! ५
निजस्वरूपी संतत रमणे
तीच भक्ति ते ज्ञान जाणणे
श्रीचरणांच्या अस्तित्वाची खूण इथे पटली! ६
संप्रदाय वाढला वाढला
हा वेलू गगनावरि गेला
ज्ञानमाउली स्वरूपरूपे पावसेस परतली! ७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(पावसच्या स्वामी स्वरुपनंदांच्या चरित्रावर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment