गीतेची पावन गंगा शतकानुशतके वाहत आहे. तिच्या तीरावरती नवनव्या प्रमेयांची वने बहरली आहेत. प्रवाहावरून वाहत येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळका अंगांगावर रोमांच फुलवीत आहेत.
कुठलाही श्लोक गुणगुणावा आणि जिभेवर विरघळणाऱ्या खडीसाखरेप्रमाणे त्याच्या अर्थाची गोडी मनात रेंगाळत राहू द्यावी. डोळे सजल व्हावेत, कंठ दाटून यावा - मनाला समाधिसुखाचा अल्पांशानं का होईना अनुभव लाभावा.
गीता गाउली आहे, दीनांची माउली आहे, संसारतापानं पोळणाऱ्यांची सावली आहे हे जाणवत असताना मनात एकच स्वप्नपुष्प फुलू पहाते -
---------------------------------------
ह्या गीतेच्या सरितेतीरी सुरम्य कुटि बांधुनी रहावे
सांजसकाळी आचमनांनी गंगेसम मन निर्मळ व्हावे!
अवगाहन नित करता करता
विनम्रभावे समरस होता
सुदाम होउनि चित्तमुकुंदा मुठीमुठींनी पोहे द्यावे!१
विनम्रभावे समरस होता
सुदाम होउनि चित्तमुकुंदा मुठीमुठींनी पोहे द्यावे!१
अर्थसुगंधित पवन येउनी
रोमरोम तनि जात फुलवुनी
आनंदाश्रूंच्या धारांनी तदा चिंब मी भिजुनी जावे!२
अनंत रत्ने असंख्य मोती
विचारेच या डोळे दिपती
कृष्णभक्तिचे काजळ रेखुन नेत्रांचे पारणे फिटावे!३
कधी संभ्रमी धनंजयासम
ग्रासत असता विषण्णतातम
झोत प्रभेचा अवचित येता विहगासम गगनी विहरावे!४
मानसात मुरलीधर यावा
वेणुनाद श्रवणी साठावा
वत्सासम मी दुडुदुडु धावत गीताधेनूशीच झटावे!५
ज्ञानकर्मभक्तीच्या त्रिदला
वाहुनिया श्रीहरिपदकमला
मीरेसम सर्वस्व समर्पुन माधवात त्या मी मिसळावे!६
गीत-गीता
कवि - श्रीराम आठवले
No comments:
Post a Comment