Wednesday, October 5, 2022

प्रतिप्रश्नाला असते उत्तर वाचत जा गीता चिंतन करता निशिदिनि त्याचे सरताती चिंता!



प्रतिप्रश्नाला असते उत्तर वाचत जा गीता 
चिंतन करता निशिदिनि त्याचे सरताती चिंता!ध्रु.

कोण असे मी? "तो मी तो मी" मनास बजवावे 
श्वासाला ते नाम जोडुनी आपण ऐकावे 
माधव बोले नित अपणाशी अभ्यासा बसता!१ 

काय करू मी? प्रश्न व्यर्थ हा, कार्य काय ठरले
निर्वाहा जे साधन आले, उपासना ठरले 
पूजन ते तर भगवंताचे सद्भावे घडता!२
 
मन का कष्टी? नावड का ती अपुल्या कामात 
देहबुद्धि ती भूलवू पाही घे घे ध्यानात
मनास अपुल्या करुनि मोकळे देवाशी वदता!३

मी का रोगी? व्यथा-यातना का मम देहाला? 
काय नि कितिदा कैसे खाशी विचार अपणाला 
तुझा तूच आजारा कारण निदान हे कळता!४ 

जे नच जवळी तेच हवेसे का ऐसे वाटे? 
जे मजपाशी असे सदाचे का न कळो येते? 
मना वळव रे आत साधका त्वरा करी आता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०९.१९८९

No comments:

Post a Comment