Sunday, November 12, 2023

येई दासबोधा, अंतरी, सोऽहं घमघमला कृपा राघवाची स्वागता शुद्ध स्वर लागला!

येई दासबोधा, अंतरी, सोऽहं घमघमला 
कृपा राघवाची स्वागता शुद्ध स्वर लागला!ध्रु. 

तुझ्या प्रसादे होता सावध कोऽहं हे कळले 
नाम दिलेसी त्या तेजाने तिमिर हि मावळले 
त्रयोदशाक्षरी मंत्र आवडे परमार्थी आगळा!१ 

एकांताची ओढ लागली मिटली नयनदले 
जनांत असुनी शांतिगृहाच्या सौख्या अनुभविले 
भक्तिकमळ उमलले पाहुनी ज्ञानभास्कराला!२ 

गुरु शिष्यांच्या संवादाची रुचीच ही वेगळी 
प्रमेय आले रुचीस येथे प्रज्ञा टवटवली 
उत्साहाचा चैतन्याचा निर्झर झुळझुळला!३

शिवथर घळ प्रत्येक मानसी सदैव असलेली 
तुझ्या वाचने साधकास ती पुरती जाणवली 
जो तो साधक डोळे मिटुनी अंतरंगि वळला!४ 

अखंड चाले सोऽहं सोऽहं रामदास वदले 
श्वासाला त्या भूदेवाने नाम जोडुनी दिले 
अनुभव घेता साधक ऐसा कणकण मोहरला!५

प्रपंच परमार्थाचे नाते उमा शंकरांचे
परस्परांविण जगी न भागे पळभर कोणाचे 
गृहस्थाश्रमी सहज पांघरे विरक्तिशालीला!६

अक्षर अक्षर ठसव मनावर ऐकावी प्रार्थना 
धार लाव प्रज्ञेला अमुच्या बळ दे गा चिंतना 
श्रीरामाचा अजुनि जिव्हाळा ध्यानी न का आला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
प्रसिद्धी सज्जनगड मासिक एप्रिल १९७७ चैत्र

No comments:

Post a Comment