साधनेचे तेज चेहऱ्यावर दिसतं
मानवाला आयुष्याच्या शेवटी कसली ना कसली खंत वाटत राहते. मी कोण आहे हे कळले नाही. ही खंत लागली पाहिजे.
मन लावून संसार केल्याने मन मळलेलं असतं. मी मूळचा तेजोमय आहे हे माणूस विसरतोच. अभ्यासाची गोडी लागली पाहिजे. रोज साधना झालीच पाहिजे. संत वचन श्रवणाने चित्त शुद्ध व्हायला लागतं. रोज अभ्यास केला तर मनही झळाळायला लागतं. चेहऱ्यावर तेज विलसतं. साधनरहित माणूस जिवंतपणीच नरकयातना भोगतो. संतवाणी ऐकली, तसे वागायचे ठरवले तर अनहित कसे होईल?
***********
मनाला नाम घेण्याचा श्रीहरि छंद लागू दे
हरी जो आतला आहे तयाशी सख्य साधू दे!ध्रु.
कळेना कोण मी ज्याला करंटा तोच या जगती
शांति ना सौख्य त्या जीवा तया ना लेश विश्रांती
हरी दे संग संतांचा जगी मी नांदतो मोदे!१
आदि ना अंत ज्याला असा मी सोवळा पूर्ण
हवे ना वाटते काही कर्म ही सर्व परिपूर्ण
दिवाळी हीच ज्ञानाची प्रसादा नित्य सेवू दे!२
बोचणी लागता जीवा चुकेना साधना येथे
कदापि खंड जर नाही कृपा ती ईश्वरी तेथे
दिवा हा रामनामाचा सदाचा शांत तेवू दे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य
No comments:
Post a Comment