Tuesday, November 7, 2023

स्थितप्रज्ञ तो जगी खरा!

दुःखाने हिरमुसला व्हायचे नाही, आनंदाने हुरळून जायचे नाही. बुद्धी कुठल्याही प्रसंगात स्थिरच ठेवायची.

भगवंतांनी एका मागून एक खुणा सांगितल्या. असा हा स्थितप्रज्ञ खऱ्या अर्थाने जीवन जगणारा असतो. पलायनवादी तर नसतोच नसतो.

शरीर यात्रा व्यवस्थित चालू ठेवावी यासाठी तो यत्नशील असतो.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अगदी आत्मतृप्त, नित्य आनंदी वृत्तीचा असतो.

मोहोराने लहडलेला आम्रवृक्षच जणू! पिसारा फुलवून नाचणारा मत्त मयूरच!

स्थितप्रज्ञाची लक्षणे विशद करून सांगण्यासाठी भगवान म्हणाले -
**********

जो उदास राही फला न वांछी
रडे न दुःखी हसे न सौख्यी
स्वतःशीच संतुष्ट पुरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!१

कुणा न वंदी कुणा न निंदी
संयम पाळी रमे न विषयी
कूर्मापरि रोधी गात्रा 
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!२

गात्र गुंतवी मनास वळवी
भजनी रंगुनी सत्पथ दावी
स्वकर्म दीपे उजळि घरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!३

कर्म न टाळी स्वधर्म पाळी
कुशल होउनी विकार जाळी
कैवल्याचा जणु पुतळा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!४

द्वाड इंद्रिया मुळी न मारी
मितोपभोगे तयां सावरी
स्थिरावली ज्याची प्रज्ञा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!५

झरा सुधेचा उदरी ज्याच्या
तृषा क्षुधाही अंकित त्याच्या
प्रसन्न नित ज्याची मुद्रा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!६

विश्व झोपते तेव्हा जागा
नच संदेहा मनात जागा
जागृत राहुन वाहि धुरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment