Saturday, November 4, 2023

नको नको करू लाड कधी इंद्रियांचे समाधान त्याने कधि का होतसे जिवाचे!

इंद्रियांचे लाड नकोत

घरात दहा माणसं असली की सर्व जणांचं करता करता घरातल्या मुख्य बाईचा जीव मेटाकुटीला येतो. तिला थोडा सुद्धा विसावा मिळत नाही. आपल्या शरीराच्या घरात पण दहाच माणसं आहेत. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये. जीव मायेत गुंतलेला मनाला विश्रांती कशी मिळायची?

देवासाठी एवढे कष्ट घेतले असते तर देव तरी प्रसन्न झाला असता - खरं तर या संसाराचा कर्ता कोण? माझे प्रयत्न व प्रभूची इच्छा असेल तरच जीवनात स्वास्थ्य मिळेल.

भक्तीने रघुपतीस आळवावे.
******

नको नको करू लाड कधी इंद्रियांचे
समाधान त्याने कधि का होतसे जिवाचे!ध्रु.

हवे हवे संपत नाही 
माय मात्र कष्टत राही 
गणित ना सुखाचे काही असे सुटायाचे!१ 

जीव गुंतला मायेत 
राम नाही हाता येत 
देह होत कोठारच हे मनोविकारांचे!२

ओढ जिवा प्रपंचाची 
तमा कोठली कष्टांची? 
मन:स्वास्थ्य गेले, ये ना नाम विठोबाचे!३ 

जीभ आणता ताब्यात 
तीही रमे अभंगात 
अता तरी साध जीवा हित आयुष्याचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

No comments:

Post a Comment