Friday, November 17, 2023

मना नाम घे, पहा अंतरी श्याम वाजवी कशी बासरी!

मनाचं प्रतिबिंब आपल्या वर्तनात!

आपल्या मनाचे प्रतिबिंब आपल्या वागण्यातून प्रतिबिंबित होते! 
देहाच्या क्षणिक सुखासाठी आपण इंद्रियांचे कौतुक करतो, इंद्रिये सांगतील तसे ऐकतो. मनाच्या घोड्याचे - इंद्रियांचे लगाम आपल्या ताब्यात ठेवले पाहिजेत. मन स्थिर होण्यासाठी नामासारखे दुसरे साधन नाही. अभ्यासाला सुरुवात केली थोडे नियम पाळू लागलो की संयम येऊ लागतो. परमार्थ हा सूक्ष्म व अंतरंगाचा असतो. अंतरीची तृप्तता भक्तीने प्राप्त होते.

**********

मना नाम घे, पहा अंतरी 
श्याम वाजवी कशी बासरी!ध्रु.

श्वासावरती लक्ष असावे 
नामस्मरणी दक्ष असावे 
राम कृष्ण हरि वदो वैखरी!१ 

तुझेच असते तुझियापाशी 
उगाच का मग वणवण फिरशी? 
एक निमिष दे वदे श्रीहरी!२ 

मना लाग रे अभ्यासाला 
जागव जागव आत जिव्हाळा
हरिभक्तीने मोक्ष ये करी!३ 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

No comments:

Post a Comment