Saturday, November 25, 2023

श्रीकृष्णाचे सद्गुण गावे, सद्गुण गावे सद्गुण घ्यावे..


श्रीकृष्णाचे सद्गुण गावे 
सद्गुण गावे सद्गुण घ्यावे!ध्रु.

खेळगडी हा गोपाळांचा 
कार्यक्रम रंगे काल्याचा 
सगळ्यांशी मी समरस व्हावे!१

अधरी लावी हरी बासरी 
हळवी फुंकर कैसी मारी 
सूरसागरी मी विहरावे!२ 

खांद्यावर घोंगडी घेतली 
गाईमागे हा वनमाळी 
ते साधेपण स्वभाव व्हावे!३ 

दैत्यांना हा ठरला भारी 
प्रतापसूर्यच जसा अंबरी 
शत हत्तींचे बळ मिळवावे!४ 

' मी करतो ' हे नसे बोलणे 
' आपण करु या ' असे सांगणे 
मी माझेपण विलया जावे!५ 

मोहन मोही रुतला नाही 
स्वरूपात तो रमून राही 
स्वरूपात राहणे जमावे!६ 

श्रीगीता कृष्णाचे जीवन 
जैसे जीवन तैसी शिकवण 
श्रीकृष्णार्पण सगळे व्हावे!७ 

गाता गाता गीता कळते 
सुखदु:खी सम होता येते 
श्यामसुंदरा आत पहावे!८ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०६.१९८७

No comments:

Post a Comment