Sunday, November 19, 2023

होणार कैसी - भगवंताची भेट?

अंत:करणी विषय राहता 
होणार नाही, होणार कैसी - भगवंताची भेट?ध्रु.

प्रवचन, कीर्तन सुंदर केले
भाराभर दृष्टांत मांडले 
दिव्याखाली अंधार परी जर - 
साधनि न धरला नेट!१ 

क्वचित आढळे विषयि विरक्ति 
फारच दुर्मिळ निर्मम भक्ति
कोटींतुनि एखादा योगी 
त्यांसी भिडतो थेट!२ 

हवीच नियमित ध्यानधारणा 
सोडणे न कधि माधवचरणा 
सोऽहं भावी नित्य नांदतो 
विशुद्ध सात्त्विक हेत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१०.१९७४
केरवा 

पै तोंडभरो का विचारा 
आणि अंतःकरणी विषयांसी थारा
तरी नातुडे धनुर्धरा 
त्रिशुद्धी मी 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५० वर आधारित काव्य.

भगवत्प्राप्तीसाठी प्रथमतः अंतःकरणातून विषयांविषयीचा ओढा नष्ट व्हावा लागतो ही गोष्ट जोपर्यंत घडून येत नाही तोपर्यंत नुसते तोंड भरून परमार्थिक विचार मांडले, त्यावर प्रवचने झोडली तरी त्यापासून काहीही प्रगती होणार नाही.

No comments:

Post a Comment