Saturday, November 11, 2023

जे मन आत्मसुखा भोगे कसे ते विषयसुखी रंगे?

जे मन आत्मसुखा भोगे
कसे ते विषयसुखी रंगे?
नच ते विषयसुखी रंगे!ध्रु.

मृगजळ आले वाहुनि गेले
प्रचंड पर्वत जरा न चळे (हाले)
समदृष्टीचा संत विरागी रमला देवासंगे!१

मेघच्छाया येत न कामा
मना मोहवी जरि अभिरामा
विषय देत जे सुखाभास ते इंद्रियसंयोगे!२

शाश्वतसुख नच विषय देतसे
जहर का कधी सुधा होतसे?
सर्पफणा का देते छाया, घातक ठरे प्रसंगे!३

विरक्ति काठी टेकू देते
झंजावाती तोल राखते
निश्चयबंधू सहाय्य देता योगाभ्यसनी दंगे!४

अहंकार मन बुद्धि न उरती
ब्रह्मसुखांतरि विरूनी जाती
जिवाशिवांचा मिलनसोहळा ऐसा अद्भुत रंगे!५

देहधारी हि तरी विदेही
ब्रह्मपदाला पावत तोही
वृत्ति मनांकित, नित्यानंदी, ब्रह्मानंदा भोगे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment