Saturday, July 13, 2024

का करिशी तू खंत? जीवा तू स्वतःच आनंद!

का करिशी तू खंत?
जीवा तू स्वतःच आनंद!ध्रु.

मी दुःखी हे मानुनि घेशी
रडशी, कुढशी तू चरफडशी
हृदयि भक्तिमकरंद!१ 

ब्रह्मरूप तू ध्यानी घ्यावे 
देहबंधनी नच गुंतावे 
घे घे सोऽहं छंद!२

होणारे ते होतचि असते 
नच घडणे ते सहजचि टळते
काळजीस करि बंद!३

मी माझेपण तुजसी भ्रमवी 
त्या चित्ता तू रामी रमवी
गातचि चल गोविंद!४

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२० (१५ नोव्हेंबर) वर आधारित काव्य. 

जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले. संत लोक आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वतःसिद्ध व आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो व त्यामुळे त्यातील सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. परमात्म्यास काय करायचे ते तो करित असतो. आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंतास शरण होऊन राहावे. काळजी आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात व कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. मग ती सुटणार कशी? भगवंताचे स्मरण करत गेल्याने वासना व काळजी दोन्हीही सुटतात.

No comments:

Post a Comment