Sunday, July 28, 2024

नरजन्म याचसाठी ' श्रीराम ' प्राप्त व्हावा!

नरजन्म याचसाठी ' श्रीराम ' प्राप्त व्हावा!ध्रु.
' श्रीराम ' प्राप्त व्हावा, तो एकला विसावा!

नामात "राम" आहे 
कामात "राम" नोहे 
"मी तोच" संतबोध या अंतरी ठसावा!१

निष्ठा अशी असावी 
नामास चित्त लावी 
अणुरेणुही जगाचा मजलागि "तो" दिसावा!२ 

शंका छळे जयाला 
भवसागरी बुडाला 
तो नामबिंदु एक या चातका पुरावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६८ (१६ जून) वर आधारित काव्य.

आपण मनुष्यजन्माला आलो ते भगवंतप्राप्ती करताच आलो. संत आपणास "तोच मी" असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. जे गोरगरीब, भोळेभाळे लोक, यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांसही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीस निघताना आपण कचेरीस वेळेवर पोहोचू अशी (अंध) श्रद्धा आपली असते. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीस पोहोचू शकत नाही. तरी पण आपण भरवसा ठेवतोच! परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने तरी करावा. पण आपण अर्धवट आहोत; म्हणजे, पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसांना शंका फार, व त्यांचे समाधान करणेही फार कठीण जाते.

No comments:

Post a Comment