Thursday, July 11, 2024

मुख्य रोग अमुचा वाटतो प्रपंच सौख्याचा!

मुख्य रोग अमुचा वाटतो प्रपंच सौख्याचा!ध्रु.

विषयी चित्ते विषयी रमती
लाभहानिची कोठली क्षिती?
प्रापंचिक जन नच स्मरती हे मी तर देवाचा!१

खोटे कळते मन नच विटते
लाचारी ते कुठली शिकते?
ते ते करता कंटाळा ना चित्ता विषयांचा!२

माझे माझे म्हणत राहतो
स्वये स्वतःला बांधुनि घेतो
जाणुनि बुजुनी स्वीकारित हा मार्ग विनाशाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६१ (१ मार्च) वर आधारित काव्य.

प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते.
आमचा मुख्य रोग, संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे.
खोटे कळूनही त्यात सुख मानून आपण राहतो व देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच पण आज करतो. तेच ते जेवण, तीच ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणे. सगळे तेच असे असताना माणसाला कंटाळा येऊ नये का?

No comments:

Post a Comment