रामा तुझाच झालो,
तुज वेगळा न उरलो!ध्रु.
जगणे तुझ्याचसाठी
मरणे तुझ्याचसाठी
नामामृती नहालो!१
मन हा तुझाच अंश
मनने तरेल वंश
तव नाम मीच झालो!२
करणे न काहि उरले
प्राप्तव्य प्राप्त झाले
स्मरणे कृतार्थ झालो!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२४ (३ मे) वर आधारित काव्य.
मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. मन हा परमेश्वराचा अंश आहे. भगवंताचे स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाअडका, प्रपंचातील सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो. धर्माचरण, भगवद्भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय आहेत. सत्संग हा त्याला तोडगा आहे. सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवत्कृपेने ते साधेल. भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.
No comments:
Post a Comment