Tuesday, July 9, 2024

कर्तेपण टाका, पात्र व्हा आपण परमार्था!

कर्तेपण टाका, पात्र व्हा आपण परमार्था!ध्रु.

नकोच दगदग, नकोच तगमग 
नको अशांती, नकोच लगबग 
मनि भक्ती नसता, कसा ये रामचंद्र हाता?१

नाम जपावे, विषय सुटावे 
स्थिरपद व्हावे, शरण रिघावे 
शांति ही खरी प्रथम पायरी जाण्या परमार्था!२ 

आनंदाचे निधान जवळी 
अंतर्मुख जर दृष्टी झाली 
सोऽहं हा भाव आवडे त्या श्रीभगवंता!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५५, (३ जून) वर आधारित काव्य.

ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्यास शरण जावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. शरण येताना मी कोण, माझा धर्म, माझे कर्म वगैरे सर्व विसरावे. ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार.

No comments:

Post a Comment