राम कृष्ण हरि! राम कृष्ण हरि! नामावलि गाता
सद्गुरु दिसले त्या नामांतरि - अर्थ मिळे गीता!ध्रु.
सद्गुरु दिसले त्या नामांतरि - अर्थ मिळे गीता!ध्रु.
नाम जाहले मजसि अनावर
सद्गुरु घालति शीतल पाखर
जगी न काही उरे अमंगल - द्वंद्वचि मावळता!१
भक्ति उगवली स्मरता माधव
शबरीच्या घरि रघुपति राघव
नामस्मरणे भक्तिगायने अवतरली कविता!२
देह भलेही राहो, जावो
भगवद्भक्ति अखंडित राहो
भक्तीसंगे ज्ञान खेळते अनुभव हा मिळता!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९७४
(प.पू. बाळासाहेब वाकडे (स्वामी माधवनाथ) प्रथम घरी आले त्या दिवशीचे काव्य.)
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१६ (११ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.
परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल. भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. ज्या स्थितीत आपणास देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे.
कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय व तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसे होण्यास राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे. गुरुने जे नामस्मरण करण्यास सांगितले असेल तेच करीत राहावे व त्यातच त्यास पहावे म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. नामस्मरणावर विश्वास ठेवावा व ते विश्वासाने घेत जावे असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे.
No comments:
Post a Comment