Saturday, July 27, 2024

जो साक्षित्वे राहतो तो दुःखी नच होतो!

जो साक्षित्वे राहतो
तो दुःखी नच होतो!ध्रु.

सत्यासत्य कळतसे त्याला
मोहजालि तो नसे गुंतला
भगवंती रंगतो, तो कष्टी नच होतो!१

व्यापामध्ये का गुंतावे?
ब्रह्मानंदा कसे मुकावे?
हसत घाव सोसतो, तो आत्मतृप्त होतो!२

निद्रेचे सुख नाहिपणाचे
ब्रह्मसौख्य तर अस्तित्वाचे
सावध नित राहतो, तो संतोषा भोगतो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८९ (२९ मार्च) वर आधारित काव्य.

सत्य वस्तु ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो पण भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षित्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापात सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षित्वाने राहायला शिकले पाहिजे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. ब्रम्हानंद हा आहेपणाने आहे व सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे.

No comments:

Post a Comment