Monday, July 22, 2024

आम्ही नव्हेच देहाचे - आम्ही आहो रामाचे!

आम्ही नव्हेच देहाचे - आम्ही आहो रामाचे!
आम्ही आहो देवाचे!ध्रु. 

देहात रमे तो बद्ध
देहात न गुंते सिद्ध
बद्ध जगाचे - मुक्त परंतु एका भगवंताचे!१ 

विषयांची गोडी सुटली 
देहोऽहं भ्रांती फिटली 
मूळ रूप जे स्वयंसिद्ध ते - भावभक्ति मनि नाचे!२ 

जे घडते इच्छा त्याची 
जे मिळे देणगी त्याची 
भक्ति भिनावी म्हणूनि धरितो चरण राघवाचे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१७ (१२ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

बद्ध हे जगाचे असतात. मुक्त जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांना देहाची आठवण नसते, ते आपला देहाभिमान, मीपणा भगवंताला देतात. विषयांचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गास लागणे. मी भगवंताचा म्हटले की तेथे बद्धपणा संपला. आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो, व त्यामुळे देहाचे सुखदुःख होते ते आपणास झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असेच आपण म्हणत असतो.  भक्तीस जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय व ती गेल्याशिवाय भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल.

No comments:

Post a Comment